कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये 48 किलो वजनी गटातील जूडो प्रकारात अस्मिता डे हिने ऐतिहासिक सुवर्णपदक पटाकवले आहे. यामुळे भारताची मान उंचावली गेली आहे.

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताच्या अस्मिता डे हिने 48 किलो वजनी गटातील महिला जूडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात जूडो प्रकारात भारताला मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे. या ऐतिहासिक यशानंतर 23 वर्षीय अस्मिताने हा विजय आपल्या प्रशिक्षकांना आणि दिवंगत वडिलांना समर्पित केला.

भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण, प्रशिक्षकांना अर्पण

सुवर्णपदक जिंकल्यानंतर अस्मिता डेने आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना अस्मिताने सांगितले की, हा विजय तिच्या कारकिर्दीसाठी, तिचे मूळ राज्य त्रिपुरासाठी आणि संपूर्ण देशासाठी अत्यंत खास आहे. या यशामागे प्रशिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे सांगत तिने हे ऐतिहासिक सुवर्णपदक त्यांना समर्पित केले.

पदक समारंभानंतर वडिलांची आठवण; अस्मिता भावूक

पदक वितरण समारंभानंतर माध्यमांशी बोलताना अस्मिता आपल्या दिवंगत वडिलांची आठवण काढताना भावूक झाली. "माझे वडील माझे सर्वात मोठे प्रेरणास्थान होते. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला सतत प्रोत्साहन दिले," असे तिने सांगितले.

Scroll to load tweet…

वडिलांच्या निधनानंतर खचली, पण हार मानली नाही

डिसेंबर 2025 मध्ये वडिलांचे अचानक निधन झाल्यानंतर अस्मिता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. त्या काळात आपले करिअर आणि आयुष्य दोन्ही संपल्यासारखे वाटत असल्याची भावना तिने व्यक्त केली. मात्र, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार तिला पुन्हा उभारी देणारा ठरला आणि ती नव्या जिद्दीने सरावाला लागली.

राष्ट्रीय निवड चाचणीपासून सुवर्णपदकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

वडिलांच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यांत झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत अस्मिताने देशात प्रथम क्रमांक मिळवत आपल्या पुनरागमनाची दमदार नोंद केली. त्यानंतरच्या कठोर मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकत भारताच्या जूडो इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले.