नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील दिलीप महादू गावित याने कॉमनवेल्थ पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पुरुषांच्या 100 मीटर T47 प्रकारात 10.71 सेकंदांचा विक्रमी वेळ नोंदवला आहे.

मुंबई : काही तासांपूर्वीपर्यंत फार कमी लोकांना माहिती असलेले नाव आता भारतीय क्रीडा विश्वात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील दिलीप महादू गावित याने कॉमनवेल्थ पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पुरुषांच्या 100 मीटर T47 प्रकारात 10.71 सेकंदांचा विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत भारतालाच आणखी एक पदक मिळाले असून मोहम्मद बासिल मोर्सिंगनकाथ यांनी रौप्यपदक जिंकले.

पाचव्या वर्षी अपघात, उपचाराअभावी गमवावा लागला हात

दिलीप गावित याचा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. नाशिकजवळील तोरण डोंगरी या आदिवासी गावात गरीब शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या वर्षी शेतात काम करताना तो झाडावरून खाली पडला. यामुळे हाताला गंभीर दुखापत झाली. योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने जखमेत संसर्ग झाला आणि अखेर एक हात कापावा लागला.

शेवटच्या 40 मीटरमध्ये पलटवार करत जिंकले सुवर्ण

अंतिम शर्यतीनंतर दिलीप याने सांगितले की, माझी सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. पहिले 60 मीटरपर्यंत ते आघाडीवर नव्हते. मात्र शेवटच्या 40 मीटरमध्ये वेग वाढवत त्याने सर्वांना मागे टाकत सुवर्णपदकावर नाव कोरले. पावसामुळे ट्रॅक ओला असल्याने धावपटूंना अडचणींचा सामना करावा लागला. तरीही दिलीप याने शांतपणे शर्यत पूर्ण करत विक्रमी वेळ नोंदवला.

शाळेतील शिक्षकांनी ओळखले कौशल्य

दिलीप याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्याचे प्रशिक्षक वैजनाथ काळे. शाळेत असतानाच प्रक्षिक्षकांनी दिलीपची धावण्यातील क्षमता ओळखली. त्यांनी दिलीपच्या पालकांची समजूत काढून त्याला प्रशिक्षणासाठी तयार केले. विशेष म्हणजे सुरुवातीला दिलीपला पॅरा क्रीडा स्पर्धांविषयी कोणतीही माहिती नव्हती. तो सामान्य खेळाडूंमध्ये स्पर्धा खेळत होता आणि तिथेही उत्कृष्ट कामगिरी करत होता.

400 मीटरमधून 100 मीटरचा बादशाह

दिलीप गावित याला सुरुवातीला 400 मीटर T47 प्रकारासाठी तयार करण्यात आले. 2023 मध्ये त्याने आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर दिलीपने पॅरालिम्पिकमध्येही सहभाग घेतला. आता 100 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकत त्याने आणखी एक ऐतिहासिक यश आपल्या नावावर केले आहे.

Scroll to load tweet…

भारताचे तिसरे सुवर्णपदक

या स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी मीराबाई चानू यांनी महिलांच्या 48 किलो वजनी गटात, तर शर्मिला धनखड यांनी पॅरा अ‍ॅथलेटिक्समधील महिलांच्या गोळाफेक F57 प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. या कामगिरीसह भारताच्या एकूण पदकांची संख्या 15 वर पोहोचली आहे.