सोमवारी दुपारी जालंधर-पठाणकोट महामार्गावर त्यांच्या मूळगावी, बेअस (जि. जालंधर, पंजाब) येथे एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे ते गंभीर जखमी झाले.

जालंधर (पंजाब) - जगभरात आपल्या धावण्याच्या विलक्षण प्रवासासाठी प्रसिद्ध असलेले, आणि ‘जगातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटू’ म्हणून ओळख मिळवणारे फौजा सिंग यांचे सोमवारी वयाच्या ११४ व्या वर्षी एका दुर्दैवी रस्ता अपघातात निधन झाले. त्यांचा मृत्यू संपूर्ण भारतासाठी आणि विशेषतः पंजाबसाठी एक मोठी हानी ठरली आहे.

बीबीसी पंजाबीच्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारी जालंधर-पठाणकोट महामार्गावर त्यांच्या मूळगावी, बेअस (जि. जालंधर, पंजाब) येथे एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तातडीने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी ७.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

सध्या फौजा सिंग यांचे पार्थिव त्यांच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. त्यांची मुले विदेशातून आल्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनामुळे पंजाबमध्ये शोकसागर उसळला असून, अनेक नामवंत व्यक्तींनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावर लिहिले, “सरदार फौजा सिंगजी यांच्या निधनाने मन सुन्न झाले आहे. ते एक प्रेरणादायी मॅरेथॉन धावपटू होते आणि त्यांनी आयुष्यभर जिद्द, संयम व सकारात्मकतेचा प्रतीक म्हणून कार्य केले. ११४ वर्षांचे असूनही त्यांची ऊर्जा आणि ध्येयवेड आजच्या पिढीला प्रेरणा देणारी होती. डिसेंबर २०२४ मध्ये मी स्वतः त्यांच्यासोबत 'नशा मुक्त – रंगला पंजाब' या दोन दिवसांच्या पदयात्रेत सहभागी झालो होतो. त्यांच्या उपस्थितीने त्या अभियानात वेगळेच प्राण फुंकले होते.”

राज्यपाल पुढे म्हणाले, “आज त्यांच्या गावी झालेल्या या दुर्दैवी अपघाताची बातमी मन हेलावणारी आहे. मात्र, पंजाबमधून नशा दूर करण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकाच्या मनात त्यांची आठवण जिवंत राहील. त्यांच्या कुटुंबियांना व जगभरातील चाहत्यांना मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.”

आयुष्याच्या नवव्या दशकात सुरू केला धावण्याचा प्रवास

फौजा सिंग यांचे जीवन म्हणजे एका अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलगा कुलदीप यांचे निधन झाल्यानंतर ते खचून गेले होते. मात्र, त्यांनी या दु:खावर मात करून नव्याने जीवन जगण्याचा निर्णय घेतला आणि वयाच्या ८९ व्या वर्षी धावण्याकडे गांभीर्याने वळाले.

त्यांनी २००० साली लंडन मॅरेथॉन मधून आपल्या मॅरेथॉन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की फौजा सिंग तरुणपणापासूनच "एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावून जाण्यासाठी" प्रसिद्ध होते.

९ मॅरेथॉन शर्यतींमध्ये सहभाग

आपल्या कारकिर्दीत फौजा सिंग यांनी लंडन, टोरांटो आणि न्यू यॉर्क येथे ४२ किलोमीटर (२६ मैल) लांबीच्या नऊ मॅरेथॉन शर्यती पूर्ण केल्या. त्यांचा सर्वोत्तम वेळ टोरांटो मॅरेथॉन मध्ये नोंदवला गेला, जो ५ तास, ४० मिनिटे आणि ४ सेकंद असा आहे.

त्यांच्या धडाडीमुळेच त्यांना २००४ च्या अ‍ॅथेनस ऑलिंपिकमध्ये आणि २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये टॉर्च बेअरर होण्याचा मानही प्राप्त झाला. त्यांनी जगप्रसिद्ध खेळाडू डेव्हिड बेकहॅम आणि मोहम्मद अली यांच्या सोबत एका नामांकित खेळ ब्रँडच्या जाहिरातीतही सहभाग घेतला होता.

वय कधीच अडसर ठरला नाही

फौजा सिंग यांच्यासाठी वय हे कधीच मर्यादा ठरली नाही. शारीरिक आरोग्य, सकारात्मक दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी अशक्यप्राय वाटणारी कामगिरी केली. त्यांनी आयुष्यभर नशा, व्यसनमुक्ती आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी काम केले. "नशा मुक्त पंजाब" चळवळीशी ते शेवटपर्यंत सक्रियपणे जोडलेले होते.

जागतिक ओळख व गौरव

फौजा सिंग हे एकमेव वयोवृद्ध भारतीय होते ज्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नाव कोरले. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला. पंजाब, भारत आणि संपूर्ण सिख समाजासाठी त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील.

फौजा सिंग यांच्या निधनानंतर एक प्रेरणादायी पर्व संपले आहे, मात्र त्यांच्या संघर्षशील जीवनशैलीची आणि अमर्याद जिद्दीची प्रेरणा अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी ठरणार आहे.