सार
एक दशकापूर्वी प्रदर्शित झालेला ‘दम लगाके हईशा’ हा चित्रपट त्याच्या भावनिक कथानकामुळे, नॉस्टॅल्जिक चार्ममुळे आणि अनोख्या पण मनाला भिडणाऱ्या प्रेमकथेमुळे प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करू शकला. हिंदी सिनेमाच्या इतिहासात टर्निंग पॉईंट ठरलेल्या या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचीच नाही, तर आयुष्मान खुरानाच्या कारकिर्दीलाही नवी दिशा दिली.
शरत कटारिया दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘विकी डोनर’सारख्या सुपरहिट चित्रपटाने बॉलीवूडमध्ये दमदार एंट्री घेतलेल्या आयुष्मानला त्यानंतर काही चुकीच्या निर्णयांमुळे अपयशाचा सामना करावा लागला. त्यामुळे ‘दम लगाके हईशा’ हा त्याच्या करिअरसाठी ‘करो या मरो’ असा ठरला होता.
आयुष्मान सांगतो, "या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी मी अनेक रात्री झोपू शकलो नाही. ‘विकी डोनर’नंतर लोक मला स्टार म्हणू लागले होते, पण मी इंडस्ट्रीत नवखा होतो. मला पुढे काय करायचं, कोणता मार्ग घ्यायचा, याचा काहीही अंदाज नव्हता. मी अनेक चुका केल्या."
तो पुढे सांगतो, "‘दम लगाके हईशा’च्या आधी माझे तीन चित्रपट फ्लॉप झाले होते. बॉलीवूडमध्ये दर शुक्रवारी कलाकारांची पुनर्जन्म आणि समाप्ती होते, असं म्हणतात. त्यामुळे हा शुक्रवार माझा असावा, असं मला मनापासून वाटत होतं. मी खूप अस्वस्थ होतो, पण या चित्रपटाने मला नवीन संधी दिली. आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिलेच नाही!"
तो पुढे चित्रपटाच्या टीमचे आभार मानत म्हणतो, "शरत कटारिया, मनीष शर्मा, आदित्य चोप्रा सर आणि माझी सहकलाकार भूमी पेडणेकर – यांच्या सर्वांच्या मेहनतीमुळे हा चित्रपट आजही लोकांच्या हृदयात घर करून आहे."
चित्रपटाच्या दहा वर्षांच्या निमित्ताने आयुष्मानने सोशल मीडियावर आपल्या १० वर्षांपूर्वीच्या ‘स्वत:ला’ एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले आहे.
“थांब थोडं, वेड्या पोरया. तू ठिक होशील. आयुष्याच्या चढ-उतारांचा अनुभव तुला येईल आणि तू त्यातून अधिक मजबूत होशील. मोठ्या योजनेबद्दल शांत रहा, घाई करायची गरज नाही. केवळ हिट मिळवणं हेच ध्येय नाही, त्यापलीकडे एक मोठी गोष्ट घडत आहे. तुझ्यातला हार्डकोर हसलर थोडा शांत कर आणि तो खरा कलाकार बन, जो तू नेहमी होऊ इच्छित होतास. आकाशाकडे बघ आणि या क्षणासाठी, या आयुष्यासाठी, अभिनेता होण्याचे स्वप्न जगण्यास मिळतंय यासाठी कृतज्ञ रहा. चिंता करू नकोस, सगळं ठीक होईल. ‘दम लगाके हईशा’ हा छोटासा पण हृदयस्पर्शी चित्रपट संपूर्ण भारतात लोकांच्या मनाला भिडेल आणि त्यांना पुन्हा प्रेमात पडायला शिकवेल. तुझ्या मुळांशी प्रामाणिक राहा, तुझ्या अंतःकरणाने तुला जे सांगते त्यावर विश्वास ठेव. तू देवाचं लाडकं अपत्य आहेस. थांब थोडं, वेड्या पोरया! ❤️”
“‘दम लगाके हईशा’ १० वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे. प्रेम, आत्मविश्वास आणि शरीरस्वास्थ्याबद्दल असलेले समाजाचे दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट होता. आणि यानेच मला माझ्या सिनेमांची निवड करण्यासाठी वेगळी दृष्टी दिली. भविष्याकडे पाहताना, मी नेहमीच हटके आणि वेगळा कंटेंट करेन, कारण हेच माझे ओळखचिन्ह आहे!