अमिताभ बच्चन: 60-70 च्या दशकातील स्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यातील शत्रुत्वामुळे निर्माता नरेंद्र बेदी यांचे मोठे नुकसान झाले. रजत बेदीने सांगितले की, याच तणाव आणि निराशेमुळे त्याचे वडील डिप्रेशनचे शिकार झाले आणि दारूच्या आहारी गेले.

राजेश खन्ना 60 आणि 70 च्या दशकात एक लोकप्रिय अभिनेते होते. तथापि, अमिताभ बच्चन यांचा 'जंजीर' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांची लोकप्रियता कमी होऊ लागली. याच कारणामुळे दोन्ही अभिनेत्यांमध्ये वैर निर्माण झाले. मात्र, या भांडणात फक्त एकाच व्यक्तीचे नुकसान झाले आणि ते म्हणजे रजत बेदीचे वडील नरेंद्र बेदी. हा खुलासा स्वतः रजतने केला आहे.

रजत बेदीच्या समोर झाला होता वडिलांचा मृत्यू

रजत बेदीने आठवण सांगितली की, त्याने आपल्या वडिलांना डोळ्यासमोर मरताना पाहिले होते. याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘ते माझ्या डोळ्यासमोर मरण पावले. मी शाळेतून आलो होतो, आणि ते खोलीतून बाहेर आले आणि माझ्यासमोर कोसळले. ते खूप दारू पिऊ लागले होते आणि डिप्रेशनमध्ये गेले होते. ते खूप चांगले काम करत होते, पण माझ्या आजोबांवर चित्रपटांशी संबंधित काही देणी होती आणि माझे वडील त्याची काळजी घेत होते.’

रजत बेदीच्या वडिलांशी का बिनसले होते राजेश खन्नांचे?

रजत बेदीने आठवण सांगितली की, अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या राजेश खन्ना यांच्या वादामुळे त्याच्या वडिलांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. तो म्हणाला, 'त्यावेळी माझ्या वडिलांनाही राजेश खन्ना यांच्यासोबत अडचणी येत होत्या. त्यांनी राजेश खन्नासोबत दोन-तीन चित्रपट सुरू केले होते आणि माझ्या वडिलांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करावे आणि त्यांच्यासोबत प्रोजेक्ट करावेत हे राजेश खन्ना यांना खटकत होते. मला खरी गोष्ट माहीत नाही, पण माझे वडील एक-दोन चित्रपटांसाठी टीमला पुण्याला घेऊन गेले होते आणि राजेश खन्ना यांच्या येण्याची वाट पाहत होते. त्यानंतर 10-15 दिवस राजेश खन्ना आले नाहीत आणि माझ्या वडिलांनी तो प्रोजेक्ट बंद केला. मला वाटतं की त्यावेळी हिरोची काहीतरी समस्या होती. त्यामुळे राजेश खन्ना आणि बाबांमध्ये काहीतरी बिनसलं, कदाचित बच्चन साहेबांमुळे किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे. त्यामुळे बाबा पिऊ लागले.'

रजत पुढे म्हणाला, 'राजेश खन्ना आणि बाबा रात्रभर दारू प्यायचे. मला आठवतंय माझ्या घरात दारूच्या पेट्या भरलेल्या असायच्या. ते सिगारेट ओढायचे, पान पराग खायचे; त्यांची जीवनशैली खूपच खराब होती. राजेश त्यांना सकाळी 5-6 वाजता सोडायचे.' नरेंद्र बेदी 'जवानी दिवानी', 'बंधन', 'महा चोर', 'बेनाम' आणि 'अदालत' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. रजत बेदी फक्त नऊ वर्षांचा असताना त्यांचे निधन झाले. रजत एक अभिनेता आहे. त्याने आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजमधून पुनरागमन केले आहे.