Sudhakar Shrotri Death : वृत्तपत्र वितरण क्षेत्रात ६५ वर्षे मोलाची सेवा बजावणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व सुधाकर श्रोत्री यांचे विलेपार्ले येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचे ते वडील होत.
Sudhakar Shrotri Death : मराठी सिनेसृष्टीतील कलाकार पुष्कर श्रोत्री यांचे वडील आणि वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील ज्येष्ठ आणि मान्यवर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले सुधाकर श्रोत्री यांचे रविवारी विलेपार्ले येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्र वितरण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आणि साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे.
कोण होते सुधाकर श्रोत्री?
सुधाकर श्रोत्री यांनी तब्बल ६५ वर्षे टाइम्स वृत्त समूहात कार्य करत वृत्तपत्र वितरण व्यवस्थेचा मजबूत पाया घालण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांची नावे त्यांना मुखोद्गत होती. त्यांच्या कामातील निष्ठा आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे ते वितरण क्षेत्रात अत्यंत आदरणीय मानले जात होते.वितरण व्यवस्थेतील अडचणी असोत किंवा व्यावसायिक प्रश्न, त्यांनी नेहमी शांत स्वभाव आणि सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांचे निराकरण केले.
साहित्याचीही विशेष आवड
वृत्तपत्र क्षेत्रातील कार्याबरोबरच सुधाकर श्रोत्री यांना साहित्याची विशेष आवड होती. त्यांनी अनेक कविता लिहिल्या असून ‘वडिलोपार्जित’, ‘लेडीज स्पेशल’ आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यावर आधारित ‘खास सचिन’ हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.
शेवटपर्यंत कार्यरत
सुधाकर श्रोत्री अखेरपर्यंत ‘पार्लेकर कायस्थ’ या त्रैमासिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवार, २ मार्च रोजी सकाळी ८ वाजता विलेपार्ले येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचे वडील
सुधाकर श्रोत्री हे हरहुन्नरी अभिनेता आणि सूत्रसंचालक पुष्कर श्रोत्री यांचे वडील होत. पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या जडणघडणीत वडिलांचा मोठा वाटा असल्याचे अनेक मुलाखतींमध्ये नमूद केले आहे. त्यांच्या पश्चात तुषार श्रोत्री, पुष्कर श्रोत्री, केतन श्रोत्री, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.


