Prarthana Behere: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचे वयाच्या ७५ व्या वर्षी एका भीषण रस्ते अपघातात निधन झाले आहे. या दुःखद घटनेनंतर, प्रार्थनाने सोशल मीडियावर एक मन हेलावणारी पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या आयुष्यात एक मोठा दुःखद प्रसंग आला आहे. एका भीषण रस्ते अपघातात तिच्या वडिलांचे अकाली निधन झाले असून, यामुळे तिच्यावर आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रार्थना बेहेरेने सोशल मीडियावर एक अतिशय भावूक पोस्ट शेअर करत वयाच्या ७५ व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्याची बातमी चाहत्यांना दिली. तिच्या या पोस्टनंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दु:ख व्यक्त करत तिचे सांत्वन केले आहे.
प्रार्थनाची मन हेलावणारी पोस्ट
वडिलांच्या आठवणीने प्रार्थनाने लिहिलेली पोस्ट वाचकाला अंतर्मुख करणारी आहे. तिने सुरुवातीलाच 'जिना इसी का नाम है' या गाण्यातील ओळी उद्धृत करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
ती वडिलांना उद्देशून लिहिते, "बाबा, तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय. तुमचा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि लोकांप्रती असलेले निस्सीम प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं."
'आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे, तर दृष्टिकोन'
वडिलांनी शिकवलेल्या जीवनमूल्यांबद्दल बोलताना प्रार्थना म्हणाली, "तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो, आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे, तर दृष्टिकोन असतो." इतरांना मदत करणे हेच खरे समाधान आहे, ही शिकवण कायम मनात राहील, असेही तिने सांगितले.
'तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली'
वडिलांच्या अचानक जाण्याने झालेल्या वेदना व्यक्त करताना प्रार्थना म्हणाली, "तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली आहे. काल-परवापर्यंत सगळं अलबेल होतं. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खूप दुखावलो आहोत."
या दुःखद घटनेकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करताना तिने म्हटले, "तुम्ही अधिक प्रत्येकाच्या जवळ राहणार आहात, कारण तुम्ही स्मरणात राहणार. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी, आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा तुमच्याशी संवाद साधू शकतोय."
'तुमच्या अप्रतिम कामाने श्रध्दांजली अर्पण करत राहीन'
प्रार्थनाने वडिलांना वचन दिले की, "तुम्हाला आजपर्यंत अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत आले आहे. आता अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला माझ्या अप्रतिम कामाने श्रध्दांजली अर्पण करत राहणे, हे माझं कर्तव्य आहे."
स्वतःला सावरत तिने लिहिले, "डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन. कारण मलाही तुम्हाला धूसर पहायचं नाही. तुमचं ओठावरचं हसू, मनात घर करून राहीलं आहे. तेच टिकवण्याची जबाबदारी मी घेणार आहे."
पोस्टचा शेवट करताना प्रार्थनाने वडिलांना दिलासा दिला: "काळजी करू नका... मी खूप strong आहे. कारण माझ्या पाठीशी नाही तर, तुम्ही सोबत आहात याची खात्री आहे. I LOVE YOU BABA, MISS YOU FOREVER... तुमची Tumpa."


