सोशल मीडिया सेन्सेशन ऑरीने त्याची एकेकाळची मैत्रीण सारा अली खानबद्दल एक मोठा खुलासा केलाय. एका पार्टीत सारानं एका मुलीला खुर्चीवरून ढकलून दिलं, पण त्याचा सगळा ताप आपल्याला सहन करावा लागला, असा दावा ऑरीने केला आहे.

मुंबई : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या ओरहान अवत्रामणी, म्हणजेच ऑरीने, त्याची एकेकाळची खास मैत्रीण सारा अली खानबद्दल एक जुना किस्सा सांगितला आहे. पिंकविलाला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत ऑरीने दावा केला की, एका पार्टीत साराने एका मुलीला खुर्चीवरून ढकलून दिलं, पण त्या घटनेनंतर जाब मात्र त्याला विचारण्यात आला.

ओरीने सांगितला पार्टीमधला तो किस्सा

रीच्या म्हणण्यानुसार, तो आणि सारा एका पार्टीत बसायला जागा शोधत होते. तेव्हा त्यांना एका खुर्चीवर एक मुलगी बसलेली दिसली.ऑरीने दावा केला की, साराने त्या मुलीला खुर्चीवरून ढकललं आणि त्यानंतर दोघं त्या रिकाम्या जागेवर बसले.

ऑरी म्हणाला की, खरी गंमत पुढे झाली. त्या मुलीने आपला सगळा राग सारावर काढण्याऐवजी ओरीवर काढला. त्याच्या मते, त्यावेळी सारा खूप लोकप्रिय असल्याने त्या मुलीने थेट तिला जाब विचारण्याऐवजी त्याला धारेवर धरलं.

त्यावेळची आठवण सांगताना ओरी म्हणाला, "मी जे केलंच नाही, त्याचा त्रास मला होत होता." त्याला आठवतंय की, त्यावेळी त्याने एक विचित्र ड्रेस घातला होता. ज्यात एक केप, फॅशनेबल फेटा आणि किटन सनग्लासेस होते. त्याच्या या विचित्र अवतारामुळे कदाचित तणाव थोडा कमी झाला असावा, असंही तो गंमतीने म्हणाला.

साराच्या लोकप्रियतेचा फटका बसला

रीने या घटनेला एक मजेशीर आठवण म्हटलंय आणि दावा केला की, ही सगळी 'स्टोरी' सारानेच तयार केली होती. त्याच्या म्हणण्यानुसार, त्या मुलीने नंतर मान्य केलं की तिला ढकलणं ही एक चूक होती, पण ओरी शेवटपर्यंत सांगत राहिला की ते काम त्याने केलेलं नाही.

सारासोबतच्या त्याच्या बिनसलेल्या नात्याच्या चर्चा सुरू असतानाच ओरीने हा खुलासा केला आहे. एकेकाळी हे दोघे नेहमी एकत्र दिसायचे, पण नंतर सोशल मीडियावर त्यांच्यात दुरावा आल्याचं दिसून आलं.

ओरी आणि सारा यांच्यात नेमकं काय घडलं?

या दोघांमधील वादाची चर्चा जानेवारी 2026 मध्ये सुरू झाली. तेव्हा ऑरीने एक इन्स्टाग्राम रील शेअर केली होती, जी नंतर डिलीट करण्यात आली. त्यात त्याने 'सारा', 'अमृता' आणि 'पलक' या नावांना '3 सर्वात वाईट नावं' म्हटलं होतं. सोशल मीडियावर याचा अर्थ सारा अली खान, तिची आई अमृता सिंग आणि अभिनेत्री पलक तिवारी असा काढण्यात आला. आता ओरीच्या या नव्या खुलाशामुळे त्यांच्या नात्यातील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अर्थात, खुर्चीवरून ढकलण्याचा हा संपूर्ण किस्सा ऑरीने सांगितलेला आहे आणि साराने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.