हृतिक रोशनने नुकतंच आनंद कुमार यांच्या 'सुपर इन्फिनिटी' उपक्रमाचं कौतुक केलं. यानंतर आनंद कुमार यांना 'सुपर 30'च्या वेळच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांनी पाटण्यातील गुरुपौर्णिमेचा तो खास किस्सा शेअर केला आहे.
गणितज्ञ आणि 'सुपर 30'चे संस्थापक आनंद कुमार यांनी हृतिक रोशनसोबतच्या काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. हृतिकने नुकतंच त्यांच्या 'सुपर इन्फिनिटी' या नव्या शैक्षणिक उपक्रमाचं सोशल मीडियावर कौतुक केलं होतं. "फक्त तुम्हीच अभ्यासाला इतकं मजेशीर बनवू शकता," असं लिहित हृतिकने त्यांना शुभेच्छा दिल्या. 'सुपर 30'च्या यशानंतर आता जगभरातील मुलांसाठी गणित हा विषय सोपा आणि रंजक बनवण्यासाठी आनंद कुमार यांनी 'सुपर इन्फिनिटी'ची सुरुवात केली आहे.
'सुपर 30'च्या शूटिंगच्या वेळचा किस्सा सांगताना आनंद कुमार म्हणाले, "माझ्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची चर्चा सुरू होती, तेव्हा मी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या स्टार्सना भेटलो. पण हृतिकजींच्या एका गोष्टीने माझं मन जिंकलं. जेव्हा आम्ही चित्रपटाच्या कथेवर चर्चा करायचो, तेव्हा ते त्यात इतके गुंग व्हायचे की अनेकदा मला सोडायला ते अनवाणी पायानेच बिल्डिंगच्या गेटपर्यंत यायचे. त्यांना चप्पल घालायलाही आठवायचं नाही. एखादा अभिनेता आपल्या कामावर किती प्रेम करू शकतो, हे मला तेव्हा समजलं."
पाटण्यातील गुरुपौर्णिमेची एक खास आठवणही त्यांनी सांगितली. ते म्हणाले, "एकदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी हृतिकजी पाटण्यात आले होते. तेव्हा ते मला म्हणाले, 'सर, मी तुम्हाला माझा गुरू मानतो. मी तुमच्याकडून खूप काही शिकलं आहे.' असं बोलून त्यांनी थेट माझे पाय धरले. तो क्षण मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही."
हृतिकच्या साधेपणाचं कौतुक करताना आनंद कुमार पुढे म्हणाले, "हृतिकजी जेवढे मोठे अभिनेते आहेत, तेवढेच ते जमिनीवर पाय असलेले माणूस आहेत. त्यांचा साधेपणा आणि कामावरची निष्ठा पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला."

'सुपर 30'च्या माध्यमातून हृतिकने आनंद कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास लाखो लोकांपर्यंत पोहोचवला. आता 'सुपर इन्फिनिटी'ला दिलेल्या पाठिंब्यामुळे, शिक्षणाला चार भिंतींच्या बाहेर नेऊन जगभरातील मुलांसाठी ते मजेशीर बनवण्याच्या आनंद कुमार यांच्या ध्येयाला आणखी बळ मिळालं आहे.




