सार
चित्रपट निर्माते नामित मल्होत्रा यांच्या DNEG कंपनीने 'ड्यून: पार्ट टू' चित्रपटातील उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी भारतासाठी ७ वा, कंपनीसाठी ८ वा ऑस्कर पुरस्कार जिंकलाय. पुरस्कार DNEG चे VFX सुपरवायझर्स स्टीफन जेम्स, राईस साल्कोम्बे यांनी स्वीकारला
लॉस एंजेलिस: भारतीय चित्रपट निर्माते नामित मल्होत्रा यांच्या निर्मिती कंपनी, DNEG ने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करत ७ वा आणि कंपनीसाठी ८ वा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. टिमोथी चालमेट आणि झेंडाया अभिनीत 'ड्यून: पार्ट टू' चित्रपटातील उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी कंपनीला हा पुरस्कार मिळाला.
DNEG ही एक आघाडीची व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), अॅनिमेशन आणि क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी कंपनी आहे ज्याने अनेक मोठ्या हॉलिवूड चित्रपटांवर काम केले आहे.
हा पुरस्कार DNEG चे VFX सुपरवायझर्स स्टीफन जेम्स आणि राईस साल्कोम्बे, तसेच प्रोडक्शन VFX सुपरवायझर पॉल लँबर्ट आणि स्पेशल इफेक्ट्स सुपरवायझर गर्ड नेफ्झर यांनी स्वीकारला.
२०११ पासून DNEG चा हा आठवा ऑस्कर विजय आहे. यापूर्वी कंपनीने 'ड्यून: पार्ट वन (२०२२)', 'टेनेट' (२०२१), 'फर्स्ट मॅन' (२०१९), 'ब्लेड रनर २०४९' (२०१८), 'एक्स मशीना' (२०१६), 'इंटरस्टेलर' (२०१५) आणि 'इन्सेप्शन' (२०११) साठी व्हिज्युअल इफेक्ट्स ऑस्कर जिंकला आहे.
प्राइम फोकसचे संस्थापक असलेले नामित मल्होत्रा, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर आणि साई पल्लवी अभिनीत आगामी चित्रपट रामायणची निर्मिती करत आहेत.
फ्रँक हर्बर्ट यांच्या १९६५ च्या सायन्स-फिक्शन कादंबरीच्या दुसऱ्या भागवर आधारित, 'ड्यून: पार्ट टू' मध्ये टिमोथी चालमेटचा पॉल अॅट्रीड्स फ्रेमेनमध्ये सामील होतो आणि त्याच्या वडिलांच्या मृत्युसाठी जबाबदार असलेल्या हार्कोनेन साम्राज्यापासून आकाशगंगेला मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. ऑस्टिन बटलर, फ्लॉरेन्स प्यू, क्रिस्टोफर वॉकेन आणि ली सेडॉक्स हे झेंडाया, रेबेका फर्ग्युसन, जेव्हियर बार्डेम, जोश ब्रोलिन आणि स्टेलन स्कार्सगार्ड या मूळ कलाकारांमध्ये सामील झाले आहेत.
चित्रपटाचा पूर्ववर्ती, 'ड्यून: पार्ट वन' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह दहा अकादमी पुरस्कार नामांकने मिळाली होती आणि मूळ संगीत, ध्वनी, चित्रपट संपादन, छायाचित्रण, निर्मिती डिझाइन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी पुरस्कार मिळाले. पहिल्या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर ४०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली.