Kannada TV Actress Nandini Dies By Suicide : कन्नड टीव्ही अभिनेत्री नंदिनी सी.एम. बंगळूरमधील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. अभिनयात करिअर करण्याची इच्छा आणि सरकारी नोकरीवरून कुटुंबासोबत झालेल्या मतभेदांमुळे तिने हे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

Kannada TV Actress Nandini Dies By Suicide : कन्नड टीव्ही अभिनेत्री नंदिनी सी.एम. हिने आत्महत्या केली आहे. ती २६ वर्षांची होती. बंगळूरमधील केंगेरी येथील तिच्या पेइंग गेस्ट (पीजी) निवासस्थानी नंदिनी मृतावस्थेत आढळली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. केंगेरी पोलीस ठाण्याचे हनुमंत हादिमानी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

पोलिसांच्या अंदाजानुसार, ही घटना २८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११:१६ ते २९ डिसेंबरच्या पहाटे १२:३० च्या दरम्यान घडली. घटनास्थळावरून पोलिसांनी नंदिनीची डायरी जप्त केली आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, वैयक्तिक कारणांमुळेच तिने आत्महत्या केल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आपल्याला सरकारी नोकरीत रस नसून अभिनयातच करिअर करायचे आहे, असे नंदिनीने डायरीत लिहिले आहे. माझ्या भावना घरचे लोक समजत नाहीत, असेही तिने डायरीत नमूद केले आहे.

पोलिसांच्या एफआयआरनुसार

नंदिनीने २०१८ मध्ये बल्लारी येथून पीयूसीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तिने इंजिनीअरिंग कोर्सला प्रवेश घेतला. पण अभिनयाची आवड असल्याने तिने राजराजेश्वरी नगरमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. २०१९ पासून, अनेक कन्नड टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर नंदिनी सुरुवातीला बंगळूरमध्ये राहत होती. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये ती केंगेरी येथे राहायला गेली.

नंदिनीचे वडील सरकारी नोकरीत होते, त्यांचे २०२३ मध्ये निधन झाले. ही नोकरी नंदिनीला मिळाली. पण ती अभिनय सोडायला तयार नव्हती. यामुळे घरात मतभेद सुरू झाले. २८ डिसेंबरच्या संध्याकाळी नंदिनी तिचा मित्र पुनीतच्या घरी गेली होती. रात्री ११:२३ च्या सुमारास ती पीजीवर परतली. त्यानंतर पुनीतने तिला अनेकदा फोन केला, पण तिने उचलला नाही. त्यामुळे रात्री ११:५० वाजता पुनीतने पीजी मॅनेजर कुमार आणि इन्चार्ज किरण यांना माहिती दिली. त्यांनी येऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, नंदिनी खिडकीच्या ग्रीलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.