Akshay Mudawadkar : अभिनेता अक्षय मुडावदकरसाठी 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील स्वामींची भूमिका ही केवळ अभिनय नव्हे तर एक आध्यात्मिक अनुभव ठरली. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि भूमिकेच्या जबाबदारीमुळे त्यांच्यात सकारात्मक बदल झाले आहेत.
‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने नुकतीच १५०० भागांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली. गेली साडेचार वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेतील स्वामी समर्थांची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय मुडावदकरसाठी हा प्रवास केवळ भूमिकेपुरता मर्यादित न राहता, एक आध्यात्मिक आणि वैयक्तिक समृद्धतेचा प्रवास ठरला आहे.
"ही माझी पहिली मालिका आणि सर्वात मोठा सन्मान!"
“मुख्य नायक म्हणून ही माझी पहिलीच मालिका. त्यातही साक्षात श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारण्याची संधी मिळणं, हे माझ्यासाठी आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे,” असं भावुक होत अक्षय सांगतो. “साडेचार वर्षांचा हा प्रवास दररोज काहीतरी नवीन शिकवणारा ठरला. बालपणापासून ज्या स्वामीबद्दल ऐकत आलो, त्यांच्याविषयी अजून खोलवर जाणता आलं. या भूमिकेमुळे संयम आणि दृष्टिकोनातही सकारात्मक बदल झाला.”
“प्रेक्षकांची प्रतिक्रिया म्हणजे खऱ्या मेहनतीचं फळ”
प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत अक्षय म्हणतो, “जे प्रेम मालिकेच्या सुरुवातीला मिळालं होतं, त्याच्या तिप्पट दाद आता मिळतेय. सोशल मीडियावर, प्रत्यक्ष भेटीतून प्रेक्षक भरभरून प्रेम व्यक्त करतात. काही वेळा त्यांच्या डोळ्यांतले आनंदाश्रू पाहून अंगावर काटा येतो. एका पालकांनी लिहिलेल्या संदेशाने मी थक्क झालो होतो. ‘तुमच्या मालिकेमुळे नव्या पिढीवर चांगले संस्कार होत आहेत.’ अशा प्रतिक्रिया माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत.”
“स्वामींची भूमिका म्हणजे जबाबदारीची जाण”
अशा श्रद्धेच्या भूमिकेसाठी अभिनय करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते. “स्वामी समर्थ हे अनेकांचं श्रद्धास्थान असल्यामुळे माझ्या वर्तनाने कुणाच्याही भावना दुखावू नयेत, याची विशेष काळजी घेतो. मालिकेची संपूर्ण टीम या गोष्टीत सतर्क आहे. मी सोशल मीडियावरही फक्त स्वामींशी संबंधित गोष्टीच शेअर करतो. उगाच काहीही पोस्ट करणं मला रुचत नाही,” असे तो स्पष्टपणे सांगतो.
“अनेक वेगळ्या भूमिका साकारण्याची संधी आहे, पण वेळ मिळत नाही”
अक्षयकडे सध्या इतर मालिकांमधून वेगळ्या भूमिकांसाठीही विचारणा होत आहेत. “आध्यात्मिक भूमिका साकारत असलो, तरी फक्त तशाच धाटणीचं काम विचारलं जातंय, असं नाही. पण सध्याचं व्यग्र वेळापत्रक जुळत नाही. भविष्यात नक्कीच वेगळ्या छटांची पात्रं साकारायला आवडतील,” असं तो स्पष्ट करतो.
“स्वामींपेक्षा मोठी भूमिका नाही!”
भविष्यात कोणती भूमिका करायला आवडेल, या प्रश्नावर अक्षय अत्यंत मनापासून म्हणतो, “सध्या मी ब्रह्मांडनायकाची भूमिका साकारतोय. याहून वेगळी, मोठी अपेक्षा ठेवणं कठीण आहे. पण कलाकार म्हणून महान व्यक्तिमत्त्वांच्या, कुटुंबप्रधान अशा विविध भूमिका साकारायची इच्छा आहे.”
“थांबायचा विचार नाही, ही भूमिका नेहमी खास राहील”
इतकी वर्ष एकाच भूमिकेत असतानाही थांबायचा विचार त्याच्या मनात आला नाही. “स्वामींच्या भूमिकेचा एक अद्भुत आकर्षण आहे. इतर काही साकारलं तरी या भूमिकेशी तुलना होणारच नाही. कलाकार म्हणून नवनवीन गोष्टी करण्याची भूक ठेवणं गरजेचं आहे, आणि ती भूक माझ्यात आहे,” तो आत्मविश्वासाने सांगतो.
“स्वामी समर्थ आता प्रेक्षकांच्या दिनक्रमाचा भाग”
‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. अक्षय म्हणतो, “ही मालिका पाहणं अनेकांचं रोजचं कर्तव्य झालंय. अनेकदा प्रेक्षक विचारतात, ‘मालिका संपली तर त्या वेळेत काय करू?’ तेव्हा जाणवतं, आपली मेहनत सफल झाली आहे.”
अभिनयातून आध्यात्मिकतेचा प्रसार
अक्षय मुडावदकर अभिनयासोबतच एका मोठ्या अध्यात्मिक चळवळीचा भाग ठरतो आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून आध्यात्मिक, साहित्यिक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, ही त्याच्या दृष्टीने सेवा आहे. “स्वामी समर्थांची सेवा अभिनयातून करता आली, हीच आयुष्यातली सर्वात मोठी कमाई,” असं म्हणत अक्षय आपला प्रवास अधिक प्रेरणादायी करतो आहे.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


