Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घरावर गुरुवारी रात्री गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन कुख्यात गँगने या गोळीबाराची जबाबदारी घेतली असून यामागील कारणही स्पष्ट केले आहे.
मुंबई : गुरुवारी रात्री उशिरा बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली. दिशाचे वडील, निवृत्त उपअधीक्षक जगदीश पटानी या घरात राहतात. पहाटे साडेचारच्या सुमारास दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि मुख्य दरवाजा व भिंतीवर चार-पाच राउंड गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला असून एसपी सिटी व एसपी क्राइम यांच्या नेतृत्वाखाली कारवाईसाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत.
कुख्यात गँगस्टरची जबाबदारी
या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांनी घेतल्याचे समोर आले आहे. या टोळीने फेसबुक पोस्टद्वारे कबुली दिली की त्यांनी हा हल्ला दिशाच्या बहिणी खुशबू पाटनीने केलेल्या विधानांच्या निषेधार्थ केला. पोस्टमध्ये स्पष्ट चेतावणी देण्यात आली की संत आणि धर्मांविरुद्ध कोणत्याही प्रकारची अपमानास्पद टिप्पणी सहन केली जाणार नाही. मात्र नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली.
हल्ल्यामागील कारण स्पष्ट
रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, "आज खुशबू पाटणी/ दिशा पाटणी यांच्या घराबाहेर झालेला गोळीबार ही कारवाई आहे. त्यांनी आमच्या पूज्य संत प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्यांचा अपमान केला. हा फक्त एक ट्रेलर आहे, पुढच्या वेळी जर कोणी आमच्या धर्माविरुद्ध अशाप्रकारे बोलले, तर आम्ही त्यांच्या घरात कोणालाही जीवंत सोडणार नाही."
खुशबू पाटणीचा वादग्रस्त व्हिडिओ
काही महिन्यांपूर्वी खुशबू पाटणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ बनवला होता. त्यात तिने प्रेमानंद महाराजांविरोधात बोलल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र खुशबूने स्पष्ट केले होते की तिचा व्हिडिओ प्रेमानंद महाराजांसाठी नसून अनिरुद्धाचार्यांविरुद्ध होता. अनिरुद्धाचार्य यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांवर केलेल्या वक्तव्यावर खुशबूने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता.
पोलिसांची चौकशी सुरू
या हल्ल्यानंतर बरेली पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. हल्ल्यानंतर आलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे पोलिसांकडून तपास अधिक गंभीरपणे केला जात आहे. यामध्ये गँगस्टर गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांचा सहभाग असल्याची खात्री करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


