बॉलिवूडची कल्ट क्लासिक फिल्म 'रहना है तेरे दिल में' ला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेत्री दिया मिर्झाने एक खास व्हिडिओ शेअर केलाय. यात तिने तिच्या १९ वर्षांच्या वयातील आठवणी आणि सिनेमाच्या शूटिंगची 'मॅजिक' चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झाच्या 'रहना है तेरे दिल में' या कल्ट क्लासिक चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातून तिने अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यावेळी ती फक्त १९ वर्षांची होती. या निमित्ताने दियाने एक खास व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. "ऑक्टोबर २००१ - तेव्हा वर्तमानपत्रांनी मला 'दिया' आणि मॅडीला 'माधवन' म्हटलं होतं. पुढे काय होणार आहे, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. तेव्हाच तुमची आणि माझी पहिली भेट झाली होती," असं दियाने तिच्या प्रेक्षकांना उद्देशून लिहिलं आहे. https://www.instagram.com/p/DerFDFnIQP1/

'ते सगळं एका मॅजिकसारखं वाटतं'

'रहना है तेरे दिल में' च्या शूटिंगचे दिवस आठवताना दिया म्हणाली, “अठरा-अठरा तासांच्या शिफ्ट्स, संपता न संपणारे रिटेक्स, हसणं, थकवा... पण माझ्या आठवणीत हे सगळं एका 'मॅजिक'सारखं वाटतं.”चित्रपटातील सदाबहार गाण्यांबद्दल बोलताना दियाने लिहिलंय, "आणि ती गाणी... २५ वर्षांनंतरही ती मला सगळीकडे ऐकायला मिळतात. पण या सगळ्यात माझ्यासोबत कायम राहिलंय ते तुमचं प्रेम."

चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दियाने कॅप्शनमध्ये पुढे लिहिलंय, "पावसात नाचणारी ती १९ वर्षांची मुलगी आज तुमच्या प्रेमासाठी खूप आभारी आहे. या २५ वर्षांत तुम्ही भरभरून प्रेम दिलं. नेहमीप्रमाणेच, रहना है तेरे दिल में." या पोस्टसोबत दियाने सेटवरचे काही न पाहिलेले बीटीएस (BTS) क्षणही शेअर केले आहेत.

आर माधवनने मानले चाहत्यांचे आभार

चित्रपटात 'मॅडी'ची मुख्य भूमिका साकारणाऱ्या आर माधवननेही इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ मेसेज शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. "रहना है तेरे दिल में रिलीज होऊन २५ वर्षे झाली आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. तो माधव शास्त्री आजही माझ्या आत जिवंत आहे, तितकाच तरुण आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की २५ वर्षे उलटून गेली आहेत. या वर्षांत लोकांनी आमच्यावर जे प्रेम केलंय, त्याची मला खोलवर जाणीव आहे," असं माधवन या व्हिडिओत म्हणाला.

'रहना है तेरे दिल में' बद्दल थोडंसं

गौतम वासुदेव मेनन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा दियाचा पहिला चित्रपट होता, तर आर माधवनचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. रिलीजच्या २१ वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.आर माधवन आणि दिया व्यतिरिक्त या चित्रपटात सैफ अली खान आणि अनुपम खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.