'प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम' या सिनेमाचा जळगाव बार असोसिएशनसाठी खास शो ठेवण्यात आला होता. हा सिनेमा पाहून अनेक वकील भावूक झाले. २६/११ च्या खटल्यातून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणणं हेच वडिलांचं मुख्य ध्येय होतं, अशी आठवण त्यांचा मुलगा अनिकेत निकम यांनी सांगितली.
मुंबई : न्याय विश्वास फाउंडेशनने जळगाव बार असोसिएशनच्या सदस्यांसाठी 'प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम' या सिनेमाचा एक खास शो आयोजित केला होता. प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या वकिलीच्या प्रवासावर आधारित हा सिनेमा पाहण्यासाठी जळगावच्या वकिलांनी मोठी गर्दी केली होती.
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासह अनेक मोठ्या गुन्हेगारी खटल्यांमध्ये उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दहशतवाद्यांना शिक्षा मिळवून देण्यासोबतच, न्यायालयीन प्रक्रियेतून दहशतवादाचं खरं रूप जगासमोर आणण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचं जगभरात कौतुक झालं आहे.
स्पेशल स्क्रीनिंग पाहून वकील भावूक
या स्क्रीनिंगबद्दल बोलताना उज्ज्वल निकम यांचा मुलगा, वकील अनिकेत निकम म्हणाला की, "माझे वडील जळगाव बार असोसिएशनचे सदस्य आहेत, त्यामुळे इथल्या वकिलांसाठी आम्ही हा खास शो ठेवला होता." एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अनिकेतने सांगितलं, "जळगावच्या अनेक वकिलांनी आज हा सिनेमा पाहिला. सिनेमा संपल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले होते, तर काहींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि अभिमान दिसत होता."
दहशतवादाचा बुरखा फाडणं हेच मुख्य ध्येय
२६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्याबाबत वडिलांचा दृष्टिकोन सांगताना अनिकेत म्हणाला की, जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला फक्त फाशी देणं एवढंच त्यांचं उद्दिष्ट नव्हतं. "कसाबला फासावर लटकवणं हे माझं एकमेव ध्येय नाही, तर कसाबच्या मागे असलेली पाकिस्तानची आयएसआय (ISI), तिथलं लष्कर आणि संपूर्ण दहशतवादी नेटवर्क जगासमोर उघड करणं हे माझं मुख्य काम आहे, असं ते नेहमी सांगायचे. कसाबच्या खटल्यातून पहिल्यांदाच पाकिस्तानी दहशतवादाचं खरं रूप एका कायदेशीर प्रक्रियेद्वारे जागतिक पातळीवर मांडलं गेलं," असंही अनिकेतने स्पष्ट केलं.
सिनेमाबद्दल थोडक्यात
दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्म्सने 'प्रहार – द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम' या सिनेमाची निर्मिती केली आहे. अविनाश अरुण यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा सध्या चित्रपटगृहांमध्ये जोरदार सुरू आहे.








