नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या बहुचर्चित चित्रपटाचा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू झालंय. यात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, सई पल्लवी सीता, यश रावण आणि शोभना कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मुंबई : चित्रपटसृष्टीला ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती, त्या नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटाच्या पहिल्या भागाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये धडकणार आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून, आजपासूनच या चित्रपटाचं ॲडव्हान्स तिकीट बुकिंग सुरू झालं आहे.

नमित मल्होत्रा यांचा प्राईम फोकस स्टुडिओ, आठ वेळा ऑस्कर जिंकणारा व्हीएफएक्स स्टुडिओ DNEG आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सने मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं अधिकृत रिलीज डेट पोस्टर लाँच करण्यात आलं, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या पोस्टरवरून चित्रपटाचा भव्य कॅनव्हास आणि पात्रांचा लूक किती जबरदस्त असेल, याचा अंदाज येतो.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, तो एक व्हिज्युअल ट्रीट आहे. सोनी पिक्चर्सने या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी घेतली आहे, तर उत्तर भारतात धर्मा प्रॉडक्शन हा चित्रपट रिलीज करणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतची सर्वात मोठी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पिढ्यानपिढ्या ज्यांची पूजा केली जाते, त्या प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे. तर सई पल्लवीने सीतामातेची भूमिका साकारली असून, तिच्यात साधेपणा, ताकद आणि करुणा यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो.

पॅन-इंडिया सुपरस्टार 'रॉकिंग स्टार' यश या चित्रपटाचा सहनिर्माता तर आहेच, पण तो जगातील सर्वात शक्तिशाली खलनायक 'रावण'च्या भूमिकेतही दिसणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शोभना यात कैकयीची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे, जुन्या 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते अरुण गोविल यात राजा दशरथाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'दंगल'सारख्या चित्रपटातून जगभरात बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडणारे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटात रवी दुबे लक्ष्मण, अजिंक्य देव महर्षी विश्वामित्र, कुणाल कपूर इंद्रदेव आणि रकुल प्रीत सिंग शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ऑस्कर विजेते संगीतकार हॅन्स झिमर आणि ए. आर. रहमान पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ऑस्कर विजेते श्रीधर राघवन यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.

आठ वेळा ऑस्कर जिंकणाऱ्या DNEG स्टुडिओने या चित्रपटाचे व्हीएफएक्स केले आहेत. "रामायण ही केवळ एक कथा नाही, तर ती आपल्या जीवनाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे. भारताचं हे सर्वात मोठं महाकाव्य त्याच्या संपूर्ण भव्यतेसह आणि प्रतिष्ठेसह जगासमोर मांडणं, हेच आमचं ध्येय आहे," असं निर्माता नमित मल्होत्रा यांनी स्पष्ट केलंय. दोन भागांत येणाऱ्या या सीरिजचा पहिला भाग भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या आणि भव्य प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. पीआरओ: आथिरा दिलजित.