सार

गेल्या तीन दिवसांपासून ट्रोल असलेल्या चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता.मात्र ट्रोलर्स यावर थांबले नाहीत या संपूर्ण मानसिक तणावातून जात असताना चिन्मयने आणखीन एक व्हिडीओ शेअर केला आहे.यात त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाच्या नावामुळे चांगलंच ट्रोल केलं जात आहे. याबाबतच नुकतंच त्याच्या पत्नीने नाव का ठेवण्यात आले हे सांगितले मात्र ट्रोलर्स एवढ्यावरच थांबले नसून यातून संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने चिन्मय मोठा निर्णय घेत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये व्हिडिओला कॅप्शन दिले आहे "छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो" असं त्यानं म्हंटल आहे.

View post on Instagram
 

चिन्मय व्हिडीओमध्ये काय म्हणाला :

नमस्कार, माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायाने मी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे.काल माझी पत्नी नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ माझ्या मुलाच्या जहांगीर या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलचा आहे. माझ्या कुटुंबाबद्दल अतिशय घाणेरड्या आणि अश्लाघ्य कमेंट्स पास केल्या जात आहेत. माझ्या पत्नीनं व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर देखील लोक कमेंट्स करत आहेत. आता लोकं मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर सोशल मीडियावरुन होत असेल तर त्याच्याशी मी बांधील नाही. माझ्या कामावरुन मला वाटेल ते बोलू शकता, तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं हे तुम्ही वयक्तिक भेटून किंवा सोशल मीडियावरून सांगू शकता. पण यामध्ये माझ्या वयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार तुम्हाला आहे असं मला अजिबात वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? यावर मी आधाीही बऱ्याच मुलाखतींमध्ये बोललो आहोत. माझ्या पत्नीनेही काल व्हिडीओमध्ये याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे हे मी ते बोलून वेळ वाया घालवत नाही.मी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारतो. आतापर्यंत सहा सिनेमांमध्ये मी ही भूमिका केली आहे, तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का आहे? हा ट्रोलर्सचा प्रमुख सूर आहे.

माझ्या महाराजांच्या भूमिकेमुळे ट्रोल होत असू तर मी या भूमिकेची राजा घेतो :

मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचंही प्रेम दिलं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशाप्रकारे त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रपणे सांगतो की, इथून पुढे मी ही भूमिका साकारणार नाही. कारण मी करत असलेलं काम, मी केलेली भूमिका, या गोष्टींचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर वडील, नवरा, कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं खूप महत्वाचं आहे.