Ankita Lokhande And Vicky Jain: ‘लाफ्टर शेफ’च्या नव्या प्रोमोमध्ये अंकिता लोखंडेने तिच्या प्रेग्नंसीची घोषणा करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मात्र, हे विधान खरे आहे की फक्त एक प्रँक, हे प्रत्यक्ष एपिसोड प्रसारित झाल्यावरच स्पष्ट होईल.

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सध्या ‘लाफ्टर शेफ’ या विनोदी आणि खाद्यप्रेमी रिअ‍ॅलिटी शोमध्ये एकत्र दिसत आहेत. दोघांचा मनमोकळा अंदाज आणि मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र आता या शोच्या एका नव्या प्रोमोमुळे त्यांच्याभोवती चर्चेचं वलय तयार झालं आहे.

प्रोमोमधून मोठी बातमी, “मी प्रेग्नेंट आहे!”

‘लाफ्टर शेफ’च्या नव्या प्रोमोमध्ये हास्याचा धमाका सुरू असतानाच अंकिता अचानक एक विधान करते, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केलं. कृष्णा अभिषेक अंकिताकडून एक पदार्थ घेऊन पळतो, आणि तो परत मिळवण्यासाठी धावताना अंकिता म्हणते. "मी प्रेग्नेंट आहे आणि मी पळू शकत नाही."

क्षणातच सेटवर शांतता पसरते. सर्वजण स्तब्ध होतात. कृष्णा विचारतो, “खरंच?”, यावर अंकिता खळखळून हसते. यानंतर कृष्णा एक गाणं म्हणतो. "आज हमारे घर में आ रहा लल्ला है!" हे ऐकताच करण कुंद्रासुद्धा चकित होतो.

View post on Instagram

खरंच गुड न्यूज आहे की फक्त मस्करी?

या प्रोमोनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. मात्र हे विधान कितपत खरं आहे, हे प्रत्यक्ष एपिसोड प्रसारित झाल्यावरच स्पष्ट होईल. कारण याआधीही अंकिताने ‘लॉकअप’ या शोमध्ये तिच्या प्रेग्नंसीबद्दलचा एक प्रँक केला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता असूनही, अधिकृत पुष्टी अजून व्हायची आहे.

कलर्स टीव्हीने देखील हा प्रोमो शेअर करत लिहिलं “अंकिताने 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर गोंधळ उडवून दिला, जेव्हा तिने खास बातमी दिली.”

अंकिता आणि विकी, मनोरंजनविश्वातील परफेक्ट जोडी

डिसेंबर २०२१ मध्ये अंकिताने बिझनेसमन विकी जैनसोबत विवाह केला. त्यांचं भव्य लग्न सोशल मीडियावर आणि माध्यमांत प्रचंड चर्चेत राहिलं. लग्नानंतर हे दोघंही वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोजमध्ये एकत्र दिसले. ‘स्मार्ट जोडी’ शोमध्ये तर त्यांनी विजेतेपद पटकावत आपली केमिस्ट्री सिद्ध केली. त्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात देखील ते एकत्र पाहायला मिळाले. आणि आता ‘लाफ्टर शेफ २’ मधून पुन्हा एकदा त्यांच्या सहजीवनाची झलक प्रेक्षकांना मिळते आहे.

प्रेक्षकांच्या उत्सुकतेचं केंद्रबिंदू

अंकिताचं हे अचानकचं विधान आणि तिचं हसणं. या दोन्ही गोष्टींमुळे प्रेक्षक गोंधळात आहेत. काहींना वाटतं ही एक मजेशीर पंच आहे, तर काहींना वाटतं की अंकिता खरंच आई होणार आहे! खरं काय, हे लवकरच समोर येईलच. पण या प्रोमोनं निश्चितच सर्वांचं लक्ष ‘लाफ्टर शेफ’कडे वळवलं आहे.