सार

‘द आर्चीज’ फेम डॉट (अदिती सैगल) 'डेसिबल' या साय-फाय थ्रिलर चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

‘द आर्चीज’मधील एथेल च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मल्टी-टॅलेंटेड कलाकार डॉट उर्फ अदिती सैगल आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. विनीत जोशी दिग्दर्शित आणि विन जोस प्रोडक्शन्स निर्मित ‘डेसिबल’ या साय-फाय थ्रिलर चित्रपटात डॉट झळकणार आहे.

या चित्रपटात डॉटसोबत अभिनेता सनी सिंग मुख्य भूमिकेत दिसणार असून, दोघे मिळून एका अशा प्रवासावर जातात जिथे काही थरकाप उडवणारे गुपित उलगडले जाते आणि त्यांचे संपूर्ण जग बदलून जाते.

एका छोट्याशा शांत गावात घडणारी ‘डेसिबल’ ही कथा विज्ञान आणि मानवी नातेसंबंध यांची सांगड घालते. या चित्रपटात एक विशेष उपकरण - ‘डेसिबल’ दाखवण्यात आले आहे, जे भूतकाळातील आवाज पुन्हा ऐकू देऊ शकते. गोंगाट आणि शांततेच्या अस्तित्व आणि हरवलेपणाच्या सीमारेषा ओलांडणारा हा साय-फाय थ्रिलर प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव घेऊन येतो.

या चित्रपटाबद्दल बोलताना डॉट म्हणाली,"संगीतकार असल्यामुळे आवाज माझ्यासाठी आधीपासूनच खूप खास आहे. जेव्हा मला 'डेसिबल'च्या कथेबद्दल कळलं, की ज्यात आवाजाच्या माध्यमातून भूतकाळ उलगडला जातो, तेव्हा मला हा विषय खूपच वेगळा वाटला. यात साय-फाय आहे, मिस्ट्री आहे आणि एक जबरदस्त ड्रामा आहे. कथा खूपच इंटेन्स आहे आणि मला प्रेक्षकांनी हा अनुभव घ्यावा असं वाटतं."

साउंड डिझाईन, तंत्रज्ञान, नातेसंबंध आणि थरार यांचा मिलाफ असलेला ‘डेसिबल’ हा चित्रपट डॉटच्या करिअरला एक वेगळं वळण देणारा ठरणार आहे.