सार

मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल एका कागदपत्रांवर सही करतानाचे फोटो शेअर केले होते आणि यामागचं कारण उद्या सांगणार असं लिहिलं होत.अखेर आज प्राजक्ताने या सही मागचा खुलासा केला आहे.तसेच हि बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील सर्वांत लोकप्रिय आणि सतत चर्चेत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीने गुरुवारी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ’23 एप्रिल रोजी सर्वांत आवडत्या आणि बहुप्रतिक्षित कागरपत्रांवर स्वाक्षरी केली असून अर्थात हे मॅरेज रजिस्ट्रेशन नाही’, असं तिने त्या पोस्ट मध्ये लिहिलं होत. प्राजक्ताने नेमक्या कोणत्या कागदपत्रांवर सही केली होती, याचा उलगडा तिने आज अखेर केला आहे.

View post on Instagram
 

प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत नव्या चित्रपटाची घोषणा तिने आज केली आहे. मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान असणारं पॅनोरमा स्टुडिओज आणि प्राजक्ता माळी हे संयुक्त विद्यमाने ‘फुलवंती’ ही भव्य कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.प्राजक्ताने या चित्रपटाची घोषणा करताच त्यावर चाहत्यांकडून आणि कलाविश्वातील विविध सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर, मुक्ता बर्वे, आरोह वेलणकर, ऋतुजा बागवे यांसारख्या कलाकारांनी प्राजक्ताला तिच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यांच्या माध्यमातून येतोय फुलवंती :

ही पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार असून प्राजक्ता यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचं लेखन-संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांचं असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करत आहे. पखवाज आणि घुंगरांच्या जुगलबंदीचं ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध छायाचित्रणकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश-विश्वजीत यांनी सांभाळली आहे.