LGBTQ अ‍ॅपवर ओखळ झालेल्या एका व्यक्तीने 22 वर्षीय तरुणाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय पीडित तरुणावर हल्ला देखील करण्यात आला. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यात LGBTQ समुदायातील व्यक्तींवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, अशाच एका प्रकारात २२ वर्षीय रेस्टॉरंट कर्मचाऱ्यावर हल्ला करून पैसे लुटल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या हल्ल्यादरम्यान पीडितेचा जबरदस्तीने व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता.

हल्ल्याची घटना आणि तक्रार

या घटनेची तक्रार नांदेड शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने सांगितले की, तो LGBTQ समुदायासाठी असलेल्या डेटिंग अ‍ॅपचा वापर करत होता. अलीकडेच एका व्यक्तीशी अ‍ॅपवर संपर्क झाल्यानंतर, तो त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्यासाठी गेला. मात्र तिथे पोहोचल्यावर त्याला जबरदस्तीने एका कारमध्ये बसवण्यात आले.

कारमध्ये असलेल्या दोन व्यक्तींनी त्याच्यावर दबाव टाकून त्याचे कपडे काढायला लावले, मारहाण केली आणि या घटनेचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत त्याच्याकडून ८,००० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.

दोन आरोपींना अटक

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रॉबिन उर्फ शुभम कांबळे (२७, रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड) आणि ओंकार मंडलिक (२८, रा. वडगाव खुर्द) या दोघांना अटक केली आहे. दोघांनी हा गुन्हा केवळ LGBTQ डेटिंग अ‍ॅपवरील व्यक्तींना लक्ष्य करण्याच्या हेतूने केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही पहिलीच घटना नाही. फेब्रुवारीमध्ये अशाच प्रकारे एका २४ वर्षीय तरुणावर हल्ला करून त्याची सोन्याची साखळी लुटण्यात आली होती. त्यातही पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. ऑगस्ट २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत आणखी एका प्रकरणात एका समलिंगी व्यक्तीला अज्ञात गटाने एक लाखांहून अधिक रकमेची मागणी केली होती.

पोलिसांचा इशारा आणि आवाहन

या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “अशा प्रकारच्या गुन्ह्यांत पीडित व्यक्ती तक्रार करण्यास घाबरतात, विशेषतः LGBTQ समुदायातील असल्यास. त्यामुळे गुन्हेगारांना उघडपणे वाव मिळतो. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की, अशा गुन्ह्यांची तक्रार जरूर करावी आणि डेटिंग अॅप्स वापरताना, प्रत्यक्ष भेटताना विशेष काळजी घ्यावी.”