Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Attempt : छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ हस्तक्षेपामुळे मुलीला वाचवण्यात यश आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती भागात चित्रपटाला शोभेल असा थरारक प्रकार घडला. एका ११ वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न पाच जणांनी केला, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ हस्तक्षेपामुळे अपहरणकर्त्यांची योजना फसली आणि मुलीला वाचवण्यात यश आलं.

नेमकं काय घडलं?

गारखेडा परिसरातील नाथप्रांगण येथे एक ११ वर्षांची मुलगी खासगी ट्यूशन क्लासवरून बाहेर पडली होती. ती घराकडे जाण्यास निघाल्याचा क्षण साधून एका सॅन्ट्रो कारमधून आलेल्या पाच जणांनी तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मुलीला घेण्यासाठी आलेल्या दुसऱ्या वाहनातील चालकाने हे दृश्य पाहताच मोठ्याने आरडाओरड केली. त्याच्या हाकेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ प्रतिसाद दिला आणि कारचा पाठलाग सुरू केला.

नागरिकांचं धाडस आणि अपहरणकर्त्यांचा पलायन

नागरिकांनी कारचा पाठलाग केल्याचं लक्षात येताच अपहरणकर्ते घाबरले. त्यांनी काही अंतरावर मुलीला कारमधून बाहेर सोडलं आणि साईनगर रस्त्यावर कार टाकून घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना रात्री ८ ते ८:३० दरम्यान घडली, आणि काही क्षणातच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र लोकांच्या तत्परतेने आणि एकजुटीने मुलीला सुरक्षित वाचवता आलं.

पोलीसांची तत्काळ कारवाई

या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपहरणकर्त्यांची सोडून दिलेली सॅन्ट्रो कार ताब्यात घेतली असून, घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींकडून माहिती गोळा करण्यात येत आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींच्या शोधासाठी पथके सक्रिय करण्यात आली आहेत.

सतर्क नागरिकांमुळे अनर्थ टळला

ही घटना म्हणजे सतर्क आणि सजग नागरिकांची ताकद काय असते याचा उत्तम नमुना आहे. मुलीचा अपहरणाचा डाव काही क्षणातच फसला, हे केवळ तिथल्या लोकांच्या धाडसामुळे शक्य झालं.

शहरी भागात अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घ्यावी, आणि नागरिकांनी देखील अशा प्रसंगी तत्पर प्रतिसाद देत सामाजिक जबाबदारी पार पाडावी.