Bhigwan Kidnapping Case : भिगवण येथील तरुणीच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. तरुणी आणि तरुण दोघेही बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. तरुणीने आपण स्वेच्छेने प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट केले आहे.
Bhigwan Kidnapping Case : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली होती. आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण करत तरुणीचे अपहरण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाला आता अनपेक्षित वळण मिळाले असून तरुणीने स्वतः पोलिसांसमोर हजर राहून अपहरणाचा आरोप फेटाळला आहे.
बारामती पोलीस ठाण्यात दोघांची हजेरी
घटनेनंतर काही तासांतच संबंधित तरुण आणि तरुणी रात्री उशिरा येथे हजर झाले. यावेळी तरुणीने बारामती शहर पोलिस स्थानकात अपहरणाचा दावा पूर्णपणे फेटाळला. आपण संबंधित तरुणावर प्रेम करत असून स्वमर्जीने त्याच्यासोबत गेल्याचे तिने स्पष्ट केले. कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याबाबतही तिने आपली बाजू मांडली आहे.
घटना कशी घडली? तरुणीचा खुलासा
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. त्या दिवशी ती आई आणि भावासोबत भिगवण बाजारात खरेदीसाठी जाणार असल्याची माहिती तिने स्वतः प्रियकराला दिली होती. तिने प्रियकराला भिगवण येथील रेस्ट हाऊसजवळील आनंद हॉटेलच्या मागील बाजूस थांबण्यास सांगितले होते. आई आणि भावाची नजर चुकवून आपण त्याच्यासोबत जाण्याचा पूर्वनियोजित निर्णय घेतल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
कुटुंबीयांना कसा चकवा दिला?
तरुणीच्या म्हणण्यानुसार, बाजारात गर्दीचा फायदा घेत ती प्रियकराकडे गेली. या संपूर्ण घटनेचा कट पूर्वनियोजित होता, असा खुलासा तिने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. त्यामुळे सुरुवातीला अपहरण म्हणून नोंदवण्यात आलेल्या प्रकरणाचा तपास आता नव्या दृष्टीकोनातून केला जात आहे.
तपासाची दिशा बदलणार?
तरुणीच्या जबाबानंतर पोलिस तपासाची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांच्या तक्रारी, कथित मारहाण आणि प्रत्यक्ष परिस्थिती याची पडताळणी सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.


