सार

पालघरमध्ये दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. खरंतर, आरोपी मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.

Palghar Double Murder Case :  पालघरमध्ये दुहेरी हत्याकांड झाल्याच घटनेने खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने कुऱ्हाडीने दोन व्यक्तींची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आणखी एका व्यक्तीच्या घरावर हल्ला केल्याचेही सांगितले जात आहे. आरोपी मनोरुग्ण असल्याचा दावा केला जात आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.

दरम्यान, आरोपीने हत्या केल्यानंतर दीडशे पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्याचा शोध घेतला जात होता. तपासात कळले की, जंगलातील तलावातील चिखलात आरोपी लपून बसला आहे. पोलिसांनी चिखलात जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नक्की काय आहे प्रकरण?
पालघर जिल्ह्यातील तारापुर येथील कुडण गावातील ही घटना आहे. या गावात गेल्या दोन-चार दिवसांपासून एक अज्ञात व्यक्ती संशयिताच्या रुपात फिरत होता. स्थानिक नागरिकांच्या मते, आरोपी मनोरुग्ण आहे. यामुळे त्याच्याकडे बहुतांशजणांनी लक्ष दिले नाही.

गुरुवारी (29 फेब्रुवारी) आरोपीने अचानक एका वृद्धावर कुऱ्हाडीने हल्ला करत त्याची हत्या केली. यानंतर वृद्ध व्यक्तीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. अशातच मृत वृद्धाचा भाऊ त्याला शोधत आला असता त्याच्यावर देखील हल्ला करत त्याची कुऱ्हाडीने हत्या केली.

चिखलात लपून बसला होता आरोपी
रिपोर्ट्सनुसार, हत्येच्या घटनेनंतर आरोपीने अन्य एका व्यक्तीच्या घरावर कुऱ्हाडीने हल्ला केला. दरवाजा आतमधून बंद असल्याने घरातील व्यक्तींनी हल्ला झाल्यानंतर आरडाओरड सुरू केली असता शेजारी धावत आले. रात्रीची वेळ असल्याने आरोपीने संधी साधत घटनास्थळावरुन पळ काढला आणि गावाबाहेरील एका तलावातील चिखलात जाऊन लपला.

या संपूर्ण घटनेबद्दल पोलिसांना कळले असता आरोपीचा शोध घेण्यासाठी दीडशे कर्मचारी तपास करू लागले. तपास सुरू झाल्यानंतर आरोपीला चिखलातून बाहेर काढत बेड्या ठोकल्या आहेत.

हत्येमागील कारण काय?
सध्या आरोपीच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, आरोपी मनोरुग्ण असून त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल. यानंतरच हत्येमागील खरे कारण समोर येईल.

आणखी वाचा : 

महिलेला बेशुद्धीचे इंजेक्शन देत बलात्कार करण्यासह दाताच्या डॉक्टरने काढले अश्लील व्हिडीओ, पोलिसांकडून अटक

Crime News : तरुणीवर बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाच पण आरोपीचे पायही कापले गेले

खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली US मधील भारतीय महिला, गमावले तब्बल चार कोटी रुपये