Maharashtra Crime : लग्नाचे आमिष दाखवून राज्यातील महिलांची कोट्यावधींना लूट करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. एका 75 वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले आहे.

Maharashtra Crime : महाराष्ट्र राज्य पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा येथून कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर असा आरोप लावण्यात आला आहे की, लग्नाच्या जाहिरातीच्या माध्यमातून महिलांशी लग्न करत जवळजवळ 25 जणींकडून त्याने कोट्यावधी रुपये उकळले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (12 जून) माहिती देत म्हटले की, आरोपी अनुज कुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी याला 24 मे रोजी अटक करण्यात आली होती. सदर आरोपी स्वत:ची बनावट ओखळ तयार करत ग्रेटर नोएडामध्ये राहत होता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

अधिकाऱ्यांनुसार, आरोपीने स्वत:ची ओखळ लपवण्यासाठी अनेक बनावट नावांचा वापर केला. यामध्ये अजय अग्रवाल, अजय संतोष सिंह आणि जयप्रकाश रमेशचंद्र गुप्ता अशा नावांचा समावेश आहे. 4 मार्च 2022 रोजी एका 75 वर्षी महिलेने नयानगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती की, आरोपीने वृत्तपत्रात लग्नाची जाहिरात देत तिच्या 45 वर्षीय मुलीशी संपर्क साधला आणि 1 मार्च 2019 मध्ये लग्न केले.

आरोपीने फ्लॅट विकण्यास भाग पाडले

तक्रारीत महिलेने म्हटले की, आरोपीने नंतर महिलेच्या परिवाराला फ्लॅट विकण्यास भाग पाडले आणि नवे घर बांधून देण्याचा दावा करत 82 लाख रुपये थोडेथोडे करुन उकळले. यानंतर 22 फेब्रुवारी 2022 रोजी आरोपी पीडितेला एका नातेवाईकाच्या लग्नासाठी दिल्लीत घेऊन गेला आणि तेथील रेल्वे स्थानकातून 33 तोळे सोनं घेऊन पसार झाला.

एवढेच नव्हे आरोपीने महिलेला मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसून आपला फोन बंद करुन पळ काढला. पोलिसांच्या मते आरोपीने तक्रारदार महिला आणि तिच्या मुलीकडून जवळजवळ 97 लाख रुपये उकळले. तपासात असे समोर आले की, आरोपीने अशाप्रकारच्या फसवणूकीच्या माध्यमातून 25 पेक्षा अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. यामध्ये दिव्यांग, मानसिकस्थिती बिघडलेल्या आणि घटस्फोटीत महिलांना आरोपीने निशाण्यावर ठेवले होते.

पोलिसांनी नक्की काय म्हटले?

पोलिसांनी म्हटले की, आरोपीने महिलांकडून लुटलेल्या पैशांतून 20 लाखांची कार खरेदी केली असून ती सध्या जप्त करण्यात आली आहे. अमरावतीमधील अन्य एका प्रकरणात त्याने 25 लाख रुपयांचा गंडा घातला होता. या तपासात असे समोर आले की, अमरावतीच्या प्रकरणात आरोपीला त्याच्याच मुलाने साथ दिली होती.

आरोपीजवळ बनावट आधार कार्ड, तीन मोबाइल फोन आणि एक एटीएम कार्ड मिळाले आहे. सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलिसांनी पीडित महिला आणि त्यांच्या परिवारांना पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे अपील केले आहे.