धाराशिवमध्ये राहणाऱ्या एका पती-पत्नीची भर रस्त्यात निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींनी हत्येनंतर पळ काढला आहे.
मुंबई : धाराशिव जिल्ह्यात करजखेडा येथील रहिवासी सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियंका पवार यांची भरदिवसा भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना ते पाटोदा चौरस्त्याकडे त्यांच्या बाईकवरून जात असताना घडली. मागून आलेल्या हरिभाऊ चव्हाण यांच्या कारने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. धडक बसताच सहदेव आणि प्रियंका पवार रस्त्यावर पडले. त्यानंतर कारमधून उतरलेल्या हरिबा चव्हाण आणि त्यांचा मुलगा जीवन चव्हाण यांनी हातात असलेल्या कोयत्याने पती-पत्नीवर सपासप वार करत त्यांचा जीव घेतला.
या हल्ल्यात प्रियंका पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहदेव पवार यांचा धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांच्या पश्चात दोन लहान मुली आणि वयोवृद्ध आई-वडील असा परिवार असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
चार वर्षांपूर्वीचा वाद ठरला जीवघेणा
सहदेव पवार आणि हरिबा चव्हाण यांच्यामध्ये चार वर्षांपूर्वी शेतीच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद एवढा वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी हरिबा चव्हाण यांनी सहदेव पवार यांच्यावर तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्या विरोधात ३०७ कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने सहदेव पवार यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. याच रागातून हरिबा चव्हाण आणि त्यांच्या मुलाने या दुहेरी हत्येची योजना आखल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांचा कसून तपास आणि आरोपींचा शोध
घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी भांडण आणि हल्ल्यांच्या घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर, या घटनेमुळे जिल्हावासियांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले असून "धाराशिवची गुन्हेगारी बिहारच्या मार्गावर तर नाही ना?" अशी चर्चा जनतेत सुरू झाली आहे. पती-पत्नीच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपींना पकडण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत.


