मुंबईत एका नवऱ्याची चक्क बायकोकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटनेचा उघड आरोपी महिलेच्या मुलीनेच केला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. 

मुंबई : मुंबईच्या गोरेगावमध्ये पती-पत्नीतील दुराव्यामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. 35 वर्षीय मेकअप आर्टिस्ट राजश्री अहिरे हिने तिच्या प्रियकरासोबत मिळून पती भरत लक्ष्मण अहिरेची हत्या केल्याप्रकरणी आरे कॉलनी पोलिसांनी तिला अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी – चंद्रशेखर पडायाची आणि त्याचा सहकारी अद्याप फरार आहेत. पतीच्या हत्येचा कट 13 वर्षांच्या मुलीच्या साक्षेमुळे उघडकीस आला.

प्रेमप्रकरणातून सुरु झाले वाद

रिपोर्टनुसार, राजश्री आणि चंद्रशेखर यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरु झाले होते. 15 जुलैच्या रात्री भरतने चंद्रशेखरला फोन करून बोलावलं. त्यानंतर ते तिघे एकत्र आले आणि वाद वाढताच चंद्रशेखरने भरतवर हल्ला केला. त्याच्या सहकाऱ्याने भरतला मागून पकडून ठेवले, तर चंद्रशेखरने छाती, पोट आणि शरीराच्या इतर भागावर मारहाण केली.

पत्नीने मदत न करता पतीला घरातच ठेवले

घटनास्थळी उपस्थित असूनही राजश्रीने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात न नेता घरी आणून तीन दिवस खोलीत बंद ठेवले. यावेळी दाम्पत्याच्या दोन मुलींनी वडिलांची अवस्था पाहिली. अखेर 13 वर्षीय मुलीने नातेवाईकांना सत्य सांगितले.

अपघाताचा बहाणा, पण सत्य बाहेर आलं

भरतचा मृत्यू 5 ऑगस्टला उपचारादरम्यान झाला. त्याआधी राजश्रीने नातेवाईक आणि पोलिसांना सांगितले की तो दुचाकी अपघातात जखमी झाला होता. मात्र, मुलीच्या साक्षेमुळे संपूर्ण कट उघडकीस आला. पोलिसांनी राजश्रीला अटक केली असून इतर दोन आरोपींचा शोध सुरु आहे.