छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरुंगातून बाहेर पडलेल्या कुथ्यात गुंडाने त्याच्याच मैत्रीणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात सदर तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री एक थरारक गुन्हा घडला. नुकताच हर्सूल कारागृहातून सुटलेला कुख्यात गुंड सय्यद फैजल उर्फ तेजा याने स्वतःच्या मैत्रिणीवर गोळीबार केला. विशेष म्हणजे, जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याचे स्वागत हार घालून त्याच मैत्रिणीनेच केले होते. मात्र, काही दिवसांनी त्याने तिच्यावरच हल्ला चढवला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली असून, सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जेलमधून सुटलेल्या गुंडाची पार्श्वभूमी
सय्यद फैजल (उर्फ तेजा) सय्यद एजाज, राहणार किलेअर्क, हा शहरातील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर बलात्कार, शस्त्रसाठा, ड्रग्स तस्करी यांसारखे 15 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो हर्सूल कारागृहातून सुटला होता. सुटकेनंतर काही दिवसांनीच त्याच्याकडून ही गंभीर घटना घडली.
घटनेची वेळ आणि ठिकाण
सोमवार, दिनांक 11 रोजी रात्री सुमारे आठ वाजता तेजा बेगमपुरा परिसरात दिसला होता. नशेत असताना त्याने तेथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो थेट किलेअर्क भागातील आपल्या मैत्रिणीच्या घरी पोहोचला.
वादातून थेट गोळीबार
मैत्रिणीच्या घरी पोहोचल्यावर दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. वाद वाढताच तेजाने थेट पिस्तूल काढले आणि तिच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच शेजारील नागरिक धावत आले, मात्र तोपर्यंत तेजा घटनास्थळावरून पसार झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस आरोपी तेजाचा शोध घेत आहेत आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


