बंगळुरूच्या जेपी नगरमध्ये भरदिवसा एका नर्सवर तिच्या पतीने जीवघेणा हल्ला केला. मूळच्या कोलकाता येथील असलेल्या मधुमितावर पतीने आधी चाकूने वार केले आणि नंतर ॲसिड फेकले. याप्रकरणी पोलिसांनी तामिळनाडूच्या व्यंकटेशला अटक केली आहे.
बंगळुरू: बंगळुरूच्या जेपी नगरमध्ये भरदिवसा लोकांसमोर एका पतीने आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करत ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मूळची कोलकाता येथील असलेली नर्स मधुमिता गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तामिळनाडूतील मदुराई येथील व्यंकटेश याला अटक केली आहे.
मधुमिता जेपी नगरच्या तिसऱ्या टप्प्यातील नारायण क्लिनिकमध्ये नर्स म्हणून काम करते. ती नाश्ता करण्यासाठी बाहेर आली असताना हा भयंकर हल्ला झाला. आपला पती व्यंकटेश दुचाकीवरून पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच, मधुमिताने जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये धाव घेतली. पण एका हातात चाकू आणि दुसऱ्या हातात ॲसिड घेऊन आलेल्या व्यंकटेशने तिला खाली पाडले. आधी तिच्यावर ॲसिड फेकले आणि नंतर चाकूने सपासप वार केले.
आजूबाजूच्या लोकांनी मधुमिताला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण व्यंकटेशने त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा ऐकून जवळच ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी धाव घेतली आणि पाठलाग करून व्यंकटेशला पकडले. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेऊन अटक केली. गंभीर जखमी झालेल्या मधुमितावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदुराईचा व्यंकटेश आणि कोलकाताची मधुमिता यांचे २०२४ मध्ये लग्न झाले होते. पण गेल्या वर्षभरापासून ते वेगळे राहत होते. व्यंकटेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. तो आधी बंगळुरूतच काम करायचा, पण मधुमितासोबत वाद झाल्यानंतर तो तामिळनाडूला परतला होता.
