मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्सने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. आता तुम्ही फक्त १० रुपये खर्च करून चांदीमध्ये डिजिटल गुंतवणूक करू शकता. यामुळे सर्वसामान्यांनाही चांदीत गुंतवणूक करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
मुंबई (१ ऑक्टोबर): मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओ कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स आणत असते. आता जिओने आपला व्यवसाय आणखी वाढवला आहे. जिओ फायनान्सने नुकतंच 'जिओ सिल्व्हर' (JioSilver) लाँच केलं आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना फक्त १० रुपयांत ९९.९ टक्के शुद्ध डिजिटल चांदीत गुंतवणूक करता येणार आहे. सर्वसामान्यांना आता अगदी कमी पैशात चांदीत गुंतवणूक करून आपली आर्थिक सुरक्षितता वाढवता येईल.
चांदीत गुंतवणुकीचे फायदे
जिओ फायनान्स ॲपवरून कर्ज, विमा, गुंतवणूक आणि पेमेंट अशा अनेक सुविधा दिल्या जातात. आता 'जिओ फायनान्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिस लिमिटेड' (JFPSL) या कंपनीने त्यांच्या ॲपवर 'जिओ सिल्व्हर' ही नवी सेवा सुरू केली आहे. या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही अगदी १० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंतची डिजिटल चांदी सहज खरेदी करू शकता.
जिओ सिल्व्हरचे इतर फायदे
तुम्ही थेट मार्केटच्या चालू दराने चांदीची खरेदी-विक्री करू शकता. चांदी विकल्यावर पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. याशिवाय, आठवडा किंवा महिन्याच्या आधारावर 'एसआयपी' (SIP) करण्याची सोयही यात आहे. तुम्ही खरेदी केलेली डिजिटल चांदी हवी असल्यास, प्रमाणित चांदीच्या नाण्यांच्या स्वरूपात थेट घरपोच मागवू शकता. 'जिओ सिल्व्हर' डॅशबोर्डवर तुम्हाला चांदीचे दर, तुमची गुंतवणूक आणि व्यवहारांची सगळी माहिती सहज पाहता येते.
या चांदीच्या शुद्धतेची NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये कडक तपासणी केली जाते. विशेष म्हणजे, प्रत्येक खरेदीवर तुम्हाला 'जिओ पॉईंट्स' मिळतील. हे पॉईंट्स वापरून तुम्ही ब्रँड वाउचर्स आणि शॉपिंगवर डिस्काउंट मिळवू शकता.
सोनं आणि चांदीसारखे मौल्यवान धातू गुंतवणुकीसाठी नेहमीच फायद्याचे ठरतात. जिओ फायनान्स प्लॅटफॉर्मच्या सीईओ सुरभी एस. शर्मा यांनी सांगितलं की, "पारंपारिक पद्धतीने आपण चांदी फक्त भौतिक स्वरूपात जवळ ठेवतो. पण जिओ सिल्व्हरने याला एका सुरक्षित आणि अत्यंत सोप्या डिजिटल संपत्तीत बदललं आहे." कंपनीने याआधी 'डिजिटल गोल्ड' सेवा यशस्वीपणे दिली आहे. आता 'जिओ सिल्व्हर'च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आणखी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे.
