संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 5 अभंग, देतील आयुष्याला कलाटणी

Published : Aug 30, 2024, 11:46 AM IST
Sant Sena Maharaj

सार

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांप्रमाणे संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने आजतागायत गायले जातात. आज संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे. यानिमित्त संत सेना महाराजांचे काही अभंग पाहूया. 

Sant Sena Maharaj Punyatithi : संत सेना महाराज यांचा जन्म वैशाख वद्य व्दादशी रविवार शके 1990 (इ.स. 1268) या दिवशी अलाहाबाद जवळ जबलपूर जिल्ह्यात विलासपूरकडे एक फाटा जातो. त्या फाट्यावर उमरिया नावाचे एक स्टेशन आहे. तेथून एक गड दिसतो. तो गड म्हणजेच बांधवगड या ठिकाणी झाला. महाराष्ट्राशी भावनिक संबंध ठेवून परप्रांतात जाऊन राहिलेले अनेक कुटुंब होते. संत सेना महाराजांचे वडीलही त्यापैकी एक होते. बांधवगड एक वैभवशाली नगर होते. राजारामसिंग यांच्या दरबारात सेना महाराजांचे वडील श्री देविदासपंत हे राजकीय सल्लागार व विज्ञानवादी वैद्य होते. सेना महाराजांच्या आईचे नाव प्रेमकुंवरबाई होते, तर पत्नीचे नाव सुंदराबाई होते. संत सेना महाराज वारकरी असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते.

सेना महाराजांनी हजारो अभंगाची निर्मिती करून सैनपंथ नावाची चळवळ भारतात सुरु केली. हीच चळवळ आज महाराष्ट्रात वारकरी म्हणून प्रसिद्ध आहे. पंढरपूरात त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. याच काळात संत चळवळीत महाराष्ट्रात त्यांचे नाव कोरले गेले. त्यांनी नंतर अनेक मराठी अभंग रचले. परंतु आपल्या समतेची शिकवण संपूर्ण भारतात पसरावी या हेतूने नंतर ते संपूर्ण भारतात फिरले. पंजाबमध्ये असतांना त्यांनी अनेक पंजाबी भाषेत दोहे रचले. हेच दोहे मोठ्या आदराने शिखांचे तिसरे गुरू गुरू अर्जुन सिंह यांनी गुरु ग्रंथ साहेबा यांच्यात समाविष्ट केले. सध्या सेना महाराजांचे मराठी अभंग उपलब्ध आहेत. संत नामदेवांप्रमाणेच सेना महाराजांच्या काही रचना शीखांच्या पवित्र अशा गुरुग्रंथसाहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत. सेना महाराजांच्या अभंगामध्ये नामपर, पंढरी वर्णनपर, उपदेशपर, आत्मपर, पाखंड खंडन पर व संत महिमा सांगणारे, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव यांचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत.

विठ्ठलपंताचे गुरू स्वामी रामानंदांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी पुढे हिंदी रचना केली. त्यामुळे त्यांना विठ्ठल पंताचे गुरुबंधू असल्याचे सांगितले जाते. संत नामदेवांप्रमाणेच संत सेना यांनी मराठी प्रदेशातून हिंदी प्रांतात जाऊन दोन्ही प्रांतांमधील भाषांमध्ये साहित्य लिहिले आहे. हे प्रसिद्ध संत सेना महाराज व्यवसायाने न्हावी होते.

1. जातां पंढरीसी सुख वाटे जीवा । आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ॥२॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार। ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें ॥३॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक। ऐसा वेणुनादी काला दावा ॥४॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर। ऐसे पाहतां निर्धार नाहीं कोठें ॥५॥

सेना म्हणे खूण सांगितली संतीं । यापरती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥
 

उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत ॥१॥

केवढा केला उपकार। काय वाणूं मी पामर ॥२॥

जडजीवा उद्धार केला। मार्ग सुपंथ दाविला ॥३॥

सेना म्हणे उतराई । होतां न दिसे कांहीं ॥४॥

 

घेतां नाम विठोबाचें। पर्वत जळती पापांचे ॥१॥

ऐसा नामाचा महिमा । वेद शिणला झाली सीमा ॥२॥

नामे तारिले अपार। महा पापी दुराचार ॥३॥

वाल्हा कोळी ब्रह्महत्यारी। नामें तारिला निर्धारीं ॥४॥

सेना बैसला निवांत। विठ्ठल नाम उच्चारीत ॥५॥

 

ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥

ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥

ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निरधरि ज्ञानदेव ॥३॥

सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेव ॥४॥

 

आम्ही वारीक वारीक। करूं हजामत बारीक ॥ ५॥

विवेक दर्पण आयना दाऊं। वैराग्य चिमटा हालऊं ।॥२॥

उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळूं ॥३॥

भावार्थाच्या बगला झाडूं । काम क्रोध नखें काढू ॥४॥

चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ॥५॥

आणखी वाचा : 

Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी 5 मोदकाचे प्रकार, पाहा रेसिपी

Ganesh Chaturthi 2024 : मुंबईतील 8 प्रसिद्ध गणपती मंडळ, वाचा कुठे व कसे पोहोचाल

PREV

Recommended Stories

पत्नीला भेट द्या 5gm चे सुंदर सुई धागा कानातले, खुप सुंदर दिसतील!
iPhone Air चा राहू काळ काही संपेना, आधी विक्री घटली, आता रिसेल व्हॅल्यूही कोसळली!