ओवशाला नववधू तिच्या माहेरची आणि सासरची काही ठराविक सुपं गौराईसमोर ओवासते. ही सुपं बांबूपासून तयार केलेली असतात. काहींच्या घरी पाच तर काहींच्या घरी दहा सुपांचा ओवसा असतो. या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळला जातो. हळदकुंकू लावले जाते. सुपात रानभाज्यांच्या पाने ठेवून मग त्यावर पाच प्रकारची फळे, सौभाग्यलेणी, पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या, सुकामेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते. ही पाच अथवा दहा सुपे गौरीपुजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओवसून तिची भक्तीभावाने ओटी भरते. त्यानंतर ही सुपं ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मोठ्या मंडळींना देते. आई-वडील, सासू-सासरे, काका-काकू, मामा-मामी, दादा-वहिनी अशा घरातील मानाने मोठ्या असलेल्या मंडळींना ही सुपे दिली जातात. या सुपांच्या बदल्यात त्या नववधूला साडी, पैसे, सोने चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात. या पद्धतींमुळे घरातील सुनेचे आणि माहेरवाशिणीचा मानसन्मान आणि कौतुक करण्याची पद्धत कोकणात आहे.