दुबई हे सर्वात सुरक्षित पर्यटन स्थळ मानले जाते. एका महिलेने याचीच परीक्षा घेतली. तिने तिची महागडी बॅग सार्वजनिक ठिकाणी सोडून बोटींगचा आनंद घेतला. परत आल्यावर बॅग तिथे होती का?
सध्याची परिस्थिती दिवसेनदिवस बिकट होत चालली आहे. कितीही कोणी सुरक्षिततेचा दावा केला अन् कितीही काळजी घेतली तरी हातोहात फसवले जाण्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. फसवणूक करण्याचे प्रकारही अनेक आहेत. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार तर घडतच असतात. कडीकुलपातील वस्तूंची कोणतीही खात्री देता येत नसताना, दुबईत एका बाईने चक्क सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षिततेचीच चाचणी घेतली. तिने एवढी जोखीम तर उचललीच, शिवाय त्याचा व्हिडीओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रवासाला गेल्यावर सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे बॅग सांभाळणे. बॅगेत कपडे असोत किंवा पैसे, बॅग सुरक्षित आहे की नाही, हे आपण दहा वेळा तपासतो. त्यातही पर्स किंवा बॅगेची किंमतच जास्त असेल, तर आपण ती कुठेही दूर ठेवण्याचे धाडस करत नाही. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये चोरीचे प्रमाण जास्त आहे. लोक पॉलिथिनची पिशवीही सोडत नाहीत. पण दुबई तशी नाही, असे म्हटले जाते. येथील एका महिलेने तब्बल 25 लाखांची बॅग दुबईतील सार्वजनिक ठिकाणी ठेवली आणि आरामात बोटींग करायला गेली. दुबईत बॅग किती सुरक्षित आहे हे तपासणे हाच तिचा उद्देश होता.
25 लाखांची बॅग सोडून बोटींग
500-1000 रुपयांची बॅग सोडायलाही आपल्याला भीती वाटते. पण या महिलेने Hermes Birkin ही महागडी बॅग सार्वजनिक ठिकाणी ठेवली. त्यानंतर ती बोटींग करायला गेली. तिच्या या धाडसाने युजर्स थक्क झाले आहेत. दुबई एक सुरक्षित शहर आहे, हे सिद्ध करणे हा या महिलेचा उद्देश होता. म्हणूनच या महिलेने असे धाडस केले. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याला तिने 'सामाजिक प्रयोग' असे कॅप्शन दिले आहे.
महिलेने तिची बिर्किन बॅग दुबईच्या प्रसिद्ध गोल्ड सूक भागातील एका बेंचवर ठेवली. त्यानंतर ती बुर दुबईला जाण्यासाठी वॉटर टॅक्सीमध्ये बसली. प्रवास जवळचा नव्हता. महिलेच्या म्हणण्यानुसार, जसजसा वेळ जात होता, तसतसे तिचे टेन्शन वाढत होते. वॉटर टॅक्सी रिकामी होती, त्यामुळे प्रवाशांची वाट पाहावी लागली, प्रवास लांबल्याने भीती आणखी वाढली. बॅग तिथे असेल की नाही, या प्रश्नाने आणि चिंतेतच तिने संपूर्ण प्रवास पूर्ण केला, असे महिलेने सांगितले.
घाबरतच महिला गोल्ड सूकमध्ये परतली. तिथे तिची बॅग पाहून तिचा विश्वासच बसेना. तिने याला 'सत्याचा क्षण' म्हटले. जिथे ठेवली होती, त्याच जागी बॅग होती. ती थोडीही इकडे-तिकडे झाली नव्हती. हे पाहून आश्चर्यचकित झालेली महिला म्हणाली, 'अरे देवा, हे फक्त दुबईतच शक्य आहे.'
हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला. एकाने कमेंट केली की, 'हे फक्त यूएईमध्येच शक्य आहे.' दुसऱ्याने 'हे भारतात करून पाहू नका' असा सल्ला दिला. आणखी एका महिलेने तिचा अनुभव शेअर करत सांगितले की, 'मी दुबईच्या पार्किंगमध्ये माझी बॅग विसरले होते आणि काही तासांनी परत आले, तेव्हा ती सुरक्षित मिळाली.' तर दुसऱ्या एका युझरने 'नॉर्वेमध्येही असाच प्रामाणिकपणा पाहायला मिळतो' अशी कमेंट केली.
सुरक्षित ठिकाण दुबई
दुबई केवळ आलिशान आणि उंच इमारतींचे शहर नाही. जगभरातील लोक दुबईला एक सुरक्षित ठिकाण मानतात. प्रामाणिकपणा, कठोर कायदे आणि सुरक्षिततेसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. हे त्याचेच आणखी एक उदाहरण आहे.


