एका व्हायरल इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये दोन तरुण व्हाइटफिल्ड ते एमजी रोडपर्यंत शर्यत लावताना दिसतात. एक जण नम्मा मेट्रोने तर दुसरा इलेक्ट्रिक स्कूटरने प्रवास करतो. बंगळूरमधील वाहतूक कोंडी आणि मेट्रोमधील गर्दी यावर विनोदी पद्धतीने भाष्य करतो.
सध्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मेट्रो सुविधा उपलब्ध केली जात असली तरी, नागरिकांच्या प्रवासाच्या समस्या कमी झालेल्या नाहीत. रेल्वे, बसच्या बरोबरीने मेट्रो, मोनो यासारख्या सेवा देशातील प्रमुख शहरांमधील सुरू झाल्या असल्या तरी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कायम आहे. तो कमी झालेला नाही. तर दुसरीकडे, रस्त्यावरील वाहने देखील त्याच वेगाने वाढत आहेत.
एका व्हायरल इंस्टाग्राम व्हिडीओने पुन्हा एकदा बंगळुरूच्या कुप्रसिद्ध वाहतूक कोंडीवर प्रकाश टाकला आहे. या टेक कॅपिटलमध्ये सार्वजनिक वाहतूक की खासगी वाहने, कशाने प्रवास जलद होतो, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या क्लिपमध्ये दोन तरुण व्हाइटफिल्ड ते एमजी रोडपर्यंत पोहोचण्याचे आव्हान स्वीकारताना दिसत आहेत. एक जण नम्मा मेट्रोने तर दुसरा इलेक्ट्रिक स्कूटरने प्रवास करतो. हा व्हिडीओ शहरातील रोजच्या प्रवासातील समस्यांचे विनोदी पण वास्तववादी चित्र दाखवतो.
गर्दीने खचाखच भरलेली मेट्रो प्रवाशांची समस्या दाखवते
मेट्रोला शहरातील सर्वात वेगवान वाहतुकीचे साधन मानले जात असले तरी, व्हिडीओ एक वेगळेच वास्तव दाखवतो. मेट्रोचा डबा पूर्ण क्षमतेने भरलेला दिसतो, अगदी उभे राहण्यासाठीही जागा नसते. प्रचंड गर्दीमुळे सर्वात कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही कशी मंदावते, हे या क्लिपमध्ये दिसून येते.
वाहतूक, पाऊस आणि बंगळूरमधील रोजचा गोंधळ
जसजशी ही शर्यत पुढे सरकते, तसतशी बंगळूरची अनिश्चित वाहतूक आणि हवामान यातील नाट्य वाढवते. प्रचंड वाहतूक आणि अचानक आलेल्या पावसानंतरही, मेट्रोने प्रवास करणारा तरुण एमजी रोडवर आधी पोहोचतो आणि कॉर्नर हाऊसमध्ये आईस्क्रीमची ऑर्डरही देतो. इलेक्ट्रिक स्कूटरस्वार मात्र गर्दीच्या रस्त्यांमधून मार्ग काढत आणि पावसामुळे मार्ग बदलून उशिरा पोहोचतो. तो प्रवासाने खूप थकलेला दिसतो.
वास्तवासह विनोदी शेवट
व्हिडीओचा शेवट एका हलक्या-फुलक्या वळणावर होतो. मेट्रोने प्रवास करणारा तरुण हार मानतो आणि इलेक्ट्रिक स्कूटरवरून घरी परत जाण्यासाठी लिफ्ट मागतो. तो गंमतीने म्हणतो की, किमान स्कूटरवरचा परतीचा प्रवास तरी आरामदायी असेल. वाहतुकीचे साधन कोणतेही असो, शहरातील वाहतूक टाळता येत नाही, या अनेक बंगळूरकरांच्या ओळखीच्या वास्तवासह या क्लिपचा शेवट होतो.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला, आणि युझर्सनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
एका युझरने कमेंट केली : "वाहतूक खरोखरच वैताग आणणारी आहे."
दुसऱ्या युझरने कमेंट केली : "बंगळूरची वाहतूक आणि हवामान यांची युती GTA 6 च्या आधीच झाली."


