Switzerland Blocks US Warplanes : इराणसोबतच्या संघर्षात अमेरिकेला मोठा धक्का. स्वित्झर्लंडने आपल्या हवाई हद्दीतून अमेरिकेची लढाऊ विमाने उडवण्यास बंदी घातली आहे. तटस्थतेच्या कायद्यानुसार आम्ही कोणत्याही युद्धात सहभागी पक्षाला मदत करू शकत नाही, असं स्विस सरकारने स्पष्ट केलंय.

Switzerland Blocks US Warplanes : इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेला एका युरोपीय देशाने मोठा झटका दिला आहे. स्वित्झर्लंडने अमेरिकेच्या लढाऊ विमानांसाठी आपली हवाई हद्द वापरण्यास बंदी घातली आहे. 'ब्लूमबर्ग'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. स्वित्झर्लंड नेहमीच कोणत्याही लष्करी संघर्षात तटस्थ राहण्याची भूमिका घेतो. याच धोरणाचा हवाला देत, इराणसोबतच्या युद्धात थेट सहभागी असलेल्या अमेरिकेच्या विमानांना परवानगी नाकारण्यात आली. बर्नमधील फेडरल सरकारने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अमेरिकेने केलेल्या दोन विनंत्या फेटाळण्यात आल्या.

मात्र, अमेरिकेच्या इतर तीन विमानांना परवानगी देण्यात आली, ज्यात दोन मालवाहू विमानांचा (transport aircraft) समावेश होता. स्विस सरकारने स्पष्ट केलं की, 'आमच्या तटस्थतेच्या कायद्यानुसार, युद्धात सामील असलेल्या कोणत्याही देशाला लष्करी कारणांसाठी आमच्या हवाई हद्दीचा वापर करू दिला जात नाही.' दरम्यान, मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा धोका लक्षात घेता, स्वित्झर्लंडने तेहरानमधील आपला दूतावास तात्पुरता बंद केला आहे.