दक्षिण चीनच्या ग्वांगझू शहरात राहणाऱ्या कोंग नावाच्या व्यक्तीने चक्क पैसे घेऊन दुसऱ्यांसाठी भांडण करण्याची सर्व्हिस सुरू केली आहे. तो ऑनलाइन भांडणासाठी ५० युआन (सुमारे ६०० रुपये) आणि प्रत्यक्ष जाऊन भांडण्यासाठी १८८ युआन घेतो.
स्वयंपाक करणं असो, रुग्णालयात रुग्णासोबत थांबणं असो किंवा दुसऱ्यांसोबत भांडण करणं असो; चीनमध्ये आता या सगळ्यासाठी भाड्याने माणसं मिळतायत. तरुण पिढीला जी रोजची कामं कंटाळवाणी वाटतात, ती पैसे देऊन दुसऱ्यांकडून करून घेण्याचा हा नवा ट्रेंड आहे. याला 'स्टँड-इन इकॉनॉमी' (Stand-in economy) असं म्हणतात.
वेळेची कमतरता असलेल्या तरुणांना डोळ्यासमोर ठेवून या सेवा सुरू झाल्या आहेत. घरातली कामं करायला वेळ नसलेले तरुण अशा कामांसाठी पैसे मोजायला सहज तयार होतात.
२०२४ मध्ये चिनी मीडियातून ही माहिती समोर आली आणि आता याने एका मोठ्या मार्केटचं रूप घेतलं आहे. चीनमधील 'रेडनोट' (Rednote) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लेगो सेट्स जोडण्यासाठी आणि हस्तकलेच्या वस्तू बनवण्यासाठी माणसं शोधणाऱ्या पोस्ट्सना तब्बल १२ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
भांडणासाठी भाड्याने माणूस
दक्षिण चीनच्या ग्वांगझू शहरात राहणाऱ्या कोंगने पैसे घेऊन दुसऱ्यांसाठी भांडण करण्याची सर्व्हिस सुरू केली आणि तो चांगलाच चर्चेत आला. ऑनलाइन भांडणासाठी तो ५० युआन (सुमारे ६०० रुपये) घेतो. तर प्रत्यक्ष जाऊन भांडण्यासाठी कितीही वेळ लागला तरी तो १८८ युआन आकारतो. मारहाण करण्याऐवजी शांततेने प्रश्न सोडवण्यावर आपला भर असतो, असं कोंग सांगतो. तो धमकावणं, खंडणी मागणं किंवा हाणामारीची कामं घेत नाही.
हांगझू शहरात राहणाऱ्या मिहान नावाच्या तरुणीने शेजाऱ्यांचा कचरा बाहेर फेकण्यासाठी ३ युआन आणि महिन्याच्या पॅकेजसाठी ९९ युआन घेण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच तिला २० हून अधिक ग्राहक मिळाले. आता तिने पार्सल आणून देणं, सुट्ट्यांमध्ये पाळीव मांजरांना खायला घालणं अशा सेवाही सुरू केल्या आहेत. प्रसिद्ध हॉटेल्सबाहेर रांगेत उभं राहण्यासाठी १० ते ३० युआन घेतले जातात.
भावनिक आधार आणि सोबत
या एजन्सीज फक्त शारीरिक कष्टाचीच कामं करत नाहीत, तर भावनिक गरजाही पूर्ण करतात. झेजियांगमधील एका महिलेने रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी आणि गिफ्ट देण्यासाठी ५० युआन घेतले. तर, वृद्धांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी दोन तासांचे ३०० युआन घेणाऱ्या सेवाही तिथे उपलब्ध आहेत.
अर्थतज्ज्ञांचं मत
चीनमधील 'लेझी इकॉनॉमी'चाच (Lazy economy) हा पुढचा भाग असल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. जिमेई युनिव्हर्सिटीच्या असोसिएट प्रोफेसर ली ना सांगतात की, अशा सेवांमुळे लोकांची सोय तर होतेच, पण सोबतच रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत.
"पैसे देऊन आयुष्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टी सोडवताना आपण खरंच स्वातंत्र्य मिळवतोय, की जगण्याचा एक भाग गमावून बसतोय?" असा प्रश्न या विचित्र ट्रेंडबद्दल सोशल मीडियावर विचारला जात आहे.
