Venezuelan President Nicolas Maduro : व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना न्यूयॉर्कमध्ये आणण्यात आले आहे. अमेरिकेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या तळावर त्यांची चौकशी केली जाईल. त्यांच्यावर यूएस न्यायालयात खटला चालवला जाईल.
Venezuelan President Nicolas Maduro In US Custody In New York : अमेरिकेच्या ताब्यात असलेले व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना न्यूयॉर्कमध्ये आणण्यात आले आहे. अमेरिकेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या तळावर त्यांची चौकशी केली जाईल. त्यांच्यावर यूएस न्यायालयात खटला चालवला जाईल. आता व्हेनेझुएलावर अमेरिका राज्य करेल, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. मादुरो यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमेरिकेच्या या आक्रमक भूमिकेवर जगातील देशांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. अनेक शहरांमध्ये निषेध निदर्शने होत आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यात व्हेनेझुएलातील ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अमेरिकेची जीवित हानी झालेली नाही. केवळ एका वॉर मशिनची हानी झाली अशी माहिती देण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्या मादुरोंचा फोटो प्रसिद्ध
अमेरिकेने ताब्यात घेतलेल्या व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचा फोटो ट्रम्प यांनी प्रसिद्ध केला आहे. यूएस नौदलाच्या जहाजावरील हा फोटो आहे. डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेतील हा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. अमेरिकेच्या ताब्यात असलेले निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकेत खटल्याला सामोरे जावे लागेल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
व्हेनेझुएलावर अमेरिका राज्य करेल - ट्रम्प
व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या आक्रमणाबाबत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. योग्य सत्ता हस्तांतरण पूर्ण होईपर्यंत काही काळ व्हेनेझुएलावर अमेरिका राज्य करेल आणि गरज पडल्यास पुन्हा हल्ला करू, असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मादुरो एक हुकूमशहा असून, पश्चिम गोलार्धात अमेरिकेचे वर्चस्व पुन्हा स्थापित केले आहे, असे ट्रम्प म्हणाले. व्हेनेझुएलामध्ये कोणाचीही अवस्था मादुरोसारखी होऊ शकते, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.


