UAE Ambassador Claims PM Modi Can Halt Iran Israel War : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फक्त एक फोन इराण-इस्रायलमधील संघर्ष थांबवू शकतो, असा विश्वास भारतातील संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राजदूत हुसेन हसन मिर्झा यांनी सोमवारी व्यक्त केला आहे.
UAE Ambassador Claims PM Modi Can Halt Iran Israel War : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोन इराण आणि इस्रायलमधील युद्ध थांबवू शकतो,' असं मोठं विधान भारतातील UAE चे राजदूत हुसेन हसन मिर्झा यांनी सोमवारी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना मिर्झा म्हणाले, 'इराणने या युद्धात आम्हाला का ओढलं, हेच कळत नाहीये. यात UAE ला सामील करून घेण्याचं काहीच कारण नव्हतं. पंतप्रधान मोदींना केवळ आखाती देशांतील नेत्यांमध्येच नाही, तर तिथल्या सामान्य लोकांमध्ये आणि व्यापारी वर्गातही प्रचंड मान आहे. त्यांनी इराण आणि इस्रायलच्या प्रमुखांना एक फोन केला, तर हा प्रश्न सुटू शकतो. फक्त एका फोनची गरज आहे.'
इराणच्या हल्ल्यात भारतीय नागरिक जखमी
जेरुसलेम: मध्य पूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. इराणने रविवारी इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एक भारतीय नागरिक जखमी झाला आहे. क्षेपणास्त्राचा एक तुकडा त्यांच्या मानेला लागला. जखमी व्यक्तीला तेल अवीवमधील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तेल अवीवमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं आहे.
इराण युद्ध: इंडिगोची दोन विमानं भरकटली
नवी दिल्ली: इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर, दिल्लीहून मँचेस्टरला निघालेलं इंडिगो कंपनीचं बोईंग 787 विमान यू-टर्न घेऊन दिल्लीला परत आलं. तर दुसरीकडे, मुंबई-लंडन इंडिगो विमान कैरोमध्ये उतरवण्यात आलं आणि त्याचा प्रवास थांबवण्यात आला. मध्य पूर्वेतील संकटामुळे एरिट्रियाच्या हवाई हद्दीवर निर्बंध आल्याने ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मँचेस्टरला निघालेलं विमान एरिट्रियाच्या हवाई हद्दीत शिरणार होतं. पण ऐनवेळी हवाई वाहतुकीच्या परवानगीमध्ये समस्या आल्याने विमानाला दिल्लीला परतावे लागले. यावर इंडिगोने प्रतिक्रिया दिली आहे की, 'पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीमुळे, दिल्लीहून मँचेस्टरला जाणारे विमान 6E033 शेवटच्या क्षणी हवाई हद्दीवरील निर्बंधांमुळे दिल्लीला परत आले.'
पाकिस्तानमध्ये १५ दिवस शाळा बंद, आठवड्यातून चारच दिवस ऑफिस
इस्लामाबाद: मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकारने इंधन बचतीसाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी सोमवारी १५ दिवसांसाठी शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचे आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून फक्त चार दिवस काम करण्याचे आदेश दिले आहेत.
रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत ९२.३५ वर
मुंबई: मध्य पूर्वेतील संकट आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. सोमवारी एकाच दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपया ५३ पैशांनी घसरून ९२.३५ च्या पातळीवर बंद झाला. ही रुपयाची आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी आहे. मध्य पूर्वेतील तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतल्याने रुपयाचे मूल्य घसरल्याचे विश्लेषण केले जात आहे.
शेअर बाजारात मोठी घसरण
मुंबई: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये एकाच दिवसात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स १,३५२.७४ अंकांनी घसरून ७७,५६६ वर बंद झाला, तर निफ्टी ४२२.४ अंकांनी घसरून २४,०२८ वर स्थिरावला.
या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात तब्बल १२.७८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यापासून गेल्या १० दिवसांत भारतीय शेअर बाजारातून ३१ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मध्य पूर्वेतील तणाव हे यामागील प्रमुख कारण मानले जात आहे.


