US tariff on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापारी संबंधांवर मोठे विधान केले आहे. त्यांनी भारतावरील टॅरिफ कमी करण्याचे संकेत देत दोन्ही देशांमधील व्यापार करार लवकरच होईल, असे म्हटले आहे.
US tariff on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी भारतासोबतच्या व्यापारी संबंधांवर महत्त्वाचे भाष्य केले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “भारत माझ्यावर सध्या खुश नाहीये, पण पुन्हा एकदा ते मला प्रेम नक्की देतील.” ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, “आम्ही भारतासोबत व्यापक आणि निष्पक्ष व्यापार कराराच्या अगदी जवळ आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, पुढील काही दिवसांत भारतावर लावलेले उच्च टॅरिफ रद्द होण्याची शक्यता आहे. हा करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यापारी संबंध पुन्हा सुधारण्याच्या मार्गावर
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही वर्षांत तणावात आले होते. तथापि, ट्रम्प यांच्या अलीकडच्या विधानावरून त्यांनी पुन्हा संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापाराबाबत चर्चा सुरू असून ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली – ट्रम्प
ट्रम्प यांनी भारताच्या भूमिकेचे कौतुक करत म्हटले की, “भारताने रशियाकडून तेल खरेदी जवळपास बंदच केली आहे. त्यामुळे आता आम्ही भारतावरील टॅरिफ कमी करू.” त्यांनी हे वक्तव्य अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत आणि दक्षिण आशियासाठीचे विशेष दूत सर्जियो गोर यांच्या शपथविधी समारंभात केले. या कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी भारताच्या आर्थिक धोरणाचे आणि सहकार्याचेही कौतुक केले.
टॅरिफ रद्दीकरणाची घोषणा लवकरच
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावले होते. मात्र, आता भारताने आपली भूमिका बदलल्यामुळे ट्रम्प यांनी तो टॅरिफ कधीही रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. पूर्वी भारताला टॅरिफच्या माध्यमातून दबावाखाली ठेवणारे ट्रम्प आता भारतासोबतचा संवाद सुधारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि राजनैतिक संबंध नव्या उंचीवर पोहोचतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

