UK Man Wakes Up With Blue Skin : UK मध्ये राहणारा 42 वर्षांचा टॉमी लिंच सकाळी झोपेतून उठला, तेव्हा आपली त्वचा निळी झालेली पाहून तो प्रचंड घाबरला. त्याला वाटलं की हा कोणता तरी गंभीर आजार आहे. पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासल्यावर जे कारण समोर आलं, ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. या सगळ्यामागे त्याची न धुता वापरलेली नवी बेडशीट होती.

UK Man Wakes Up With Blue Skin : युकेमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत एक विचित्र घटना घडली. तो सकाळी झोपेतून उठला, तेव्हा त्याची त्वचा चक्क निळी झाली होती. 42 वर्षांच्या टॉमी लिंच नावाच्या या व्यक्तीला हा प्रकार पाहून धक्काच बसला. त्वचेचा रंग बदलण्यासोबतच त्याला खूप थकवाही जाणवत होता. त्यामुळे तो खूप घाबरला. आपल्याला कोणता तरी गंभीर आजार झालाय असं समजून तो थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला. सुरुवातीला डॉक्टरांनाही काही कळेना. पण टॉमीशी बोलून आणि तपासणी केल्यावर जेव्हा खरं कारण समोर आलं, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

विचित्र रंगबदल

झोपेतून उठल्यावर त्वचेचा बदललेला रंग आणि थकवा यामुळे घाबरलेल्या टॉमीने केअरर म्हणून काम करणाऱ्या आपल्या एका मित्राला फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर त्याच्या मित्राने घरी येऊन त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे त्याला थेट इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं.

Scroll to load tweet…

सुरुवातीला टॉमीचं हे निळं रूप पाहून मेडिकल स्टाफही चिंतेत पडला होता. डॉक्टरांनी लगेच त्याला ऑक्सिजन लावला आणि या विचित्र रंगाचं कारण शोधण्यासाठी तपासण्या सुरू केल्या. टॉमीला तपासत असताना, एका डॉक्टरने अल्कोहोल स्वॅबने (एक प्रकारचा कापसाचा बोळा) त्याचा हात पुसला. आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करत तो कापसाचा बोळा लगेच निळा झाला. या अनपेक्षित घटनेमुळे टॉमीच्या निळ्या रंगाचं रहस्य क्षणात उलगडलं.

Scroll to load tweet…

कारण ठरली नवी नेव्ही ब्लू बेडशीट

खरं तर, टॉमीच्या त्वचेचा रंग बदलण्यामागे कोणतंही वैद्यकीय कारण नव्हतं. तर त्याने नुकत्याच वापरायला सुरुवात केलेल्या नव्या नेव्ही ब्लू रंगाच्या बेडशीटमुळे हे घडलं होतं. टॉमीने न धुता दोन रात्री या नव्या बेडशीटवर झोप काढली होती. त्यामुळे बेडशीटचा रंग त्याच्या शरीरावर चढला होता. यामागचं खरं कारण कळताच तिथलं गंभीर वातावरण एकदम हलकंफुलकं झालं. "मी तर अवतार सिनेमातल्या कॅरेक्टरसारखा दिसतोय," असं म्हणत टॉमीने स्वतःच यावर विनोद केला.

Scroll to load tweet…

आपल्याला पाहून डॉक्टर म्हणाले की, "आम्ही पहिल्यांदाच निळ्या रंगाचा निरोगी माणूस पाहतोय," असंही टॉमीने गंमतीत सांगितलं. ही किंग साईजची नेव्ही ब्लू बेडशीट त्याला डेल नावाच्या मित्राने गिफ्ट दिली होती. "नवीन कपडे किंवा बेडशीट वापरण्यापूर्वी धुवावी लागतात हे मला माहीतच नव्हतं," असं टॉमी म्हणाला. जर त्याने तसं केलं असतं, तर बेडशीटचा अतिरिक्त रंग निघून गेला असता. पण कारण कळल्यानंतरही शरीरावरचा हा रंग पूर्णपणे जायला जवळपास एक आठवडा लागला, असंही टॉमीने सांगितलं.