सार
डिलनचा एकुलता एक मित्र बुश होता असे मानले जाते. बुशला मात्र अनेक मित्र होते. बुश आणि एला यांनी डेट करायला सुरुवात केल्यावर डिलनला त्रास होऊ लागला.
कोट्यवधींच्या संपत्तीचा वारसदार असलेल्या तरुणाला त्याच्या मित्राची क्रूरपणे हत्या केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. डिलन नावाच्या या तरुणाला खून प्रकरणी शिक्षा झाली असून तो २९२ दशलक्ष डॉलर (२५०० कोटी) संपत्तीचा वारसदार आहे असे वृत्तसंस्था कळवतात.
२४ वर्षीय डिलनने त्याचा रूममेट आणि एकुलता एक मित्र विल्यम बुशची क्रूरपणे हत्या करण्यापूर्वी ऑनलाइन काही माहिती शोधली होती, असे तपासात आढळून आले आहे. यात मानेच्या शरीररचनेचाही समावेश होता.
२०२३ च्या क्रिसमसच्या आदल्या दिवशी डिलन थॉमसने त्याचा मित्र आणि रूममेट विल्यम बुशची क्रूरपणे हत्या केली. प्राथमिक शाळेत असतानाच दोघांची ओळख झाली होती. दोघेही बर्याच काळापासून एकत्र राहत होते. मात्र, बुश त्याची प्रेयसी एला जेफ्रीससोबत राहायला जाणार आहे हे कळल्यावर डिलन चिडला.
त्या क्रिसमसच्या आदल्या दिवशी, कुटुंबाला भेटायला जाण्यापूर्वी डिलनने बुशला भेटण्याची विनंती केली. बुशला त्याच्या बेडरूममध्ये बोलावल्यानंतर डिलनने त्याच्यावर वारंवार चाकूने वार केले. बुशने पळून जाण्याचा प्रयत्न केला. रक्तस्त्राव होत असतानाही तो पायऱ्या उतरला. मात्र, डिलनने त्याचा पाठलाग करून त्याला अडवले आणि पुन्हा चाकूने वार केले. मानेवर वारंवार वार झाल्याने बुश जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
डिलनचा एकुलता एक मित्र बुश होता असे मानले जाते. बुशला मात्र अनेक मित्र होते. बुश आणि एला यांनी डेट करायला सुरुवात केल्यावर डिलनला त्रास होऊ लागला. डिलनने बुशला अनेकदा मी तुला मारून टाकीन असे सांगितले होते, असे बुशच्या प्रेयसी एलाने पोलिसांना सांगितले.
अटकेनंतर डिलनवर स्किझोफ्रेनियासाठी उपचार सुरू होते. अटकेनंतर त्याने अनेकदा मी येशू आहे असे सांगितले. वेळेवर मानसिक आजारावर उपचार घेणे त्याला शक्य झाले नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. तरीही, डिलनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बुशचे कुटुंब आणि प्रेयसी एला यांना अजूनही त्यांच्या दुःखाचा सामना करावा लागत आहे.
डिलन थॉमस हा त्याचे आजोबा सर गिल्बर्ट स्टॅनली थॉमस यांनी स्थापन केलेल्या पीटर्स फूड सर्व्हिसेस या केटरिंग कंपनीशी संबंधित २९२ दशलक्ष डॉलरच्या संपत्तीचा वारसदार आहे.