Dream Maldives Wedding Turns Into Nightmare for Amsterdam Couple Stranded by Flight Cancellations: लग्नासाठी मालदीवला गेलेल्या एका जोडप्याचा प्लॅन पुरता फसला. पाच दिवसांची ट्रीप ठरलेली असताना, मध्य पूर्वेतील संघर्षामुळे फ्लाईट्स रद्द झाल्या आणि ते तिथेच अडकून पडले.

Dream Maldives Wedding Turns Into Nightmare for Amsterdam Couple Stranded by Flight Cancellations: ही गोष्ट आहे सिमोना मुसू आणि डीन शीपर्स यांची. मूळचे दक्षिण आफ्रिकेचे, पण सध्या ॲमस्टरडॅमला राहतात. २२ फेब्रुवारीला जेव्हा ते मालदीवच्या माले विमानतळावर उतरले, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता. एका खास कारणासाठी ते इथे आले होते - त्यांच्या अधिकृत लग्नाआधी, समुद्राकिनारी एक छानसं वेडिंग सेलिब्रेशन करण्यासाठी.

सुरुवातीला सगळं काही ठरल्याप्रमाणे मस्त सुरू होतं. विमानतळावरून त्यांना थेट सी-प्लेनने रिसॉर्टवर नेण्यात आलं. लग्नसोहळा छान पार पडला, त्यानंतर पाच दिवसांचा हनिमूनही त्यांनी एन्जॉय केला. पण जेव्हा ते मायदेशी परतण्यासाठी विमानतळावर पोहोचले, तेव्हा त्यांना एक धक्कादायक बातमी समजली. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे नेदरलँड्सला जाणारी त्यांची फ्लाईट रद्द झाली होती. आणि तिथूनच त्यांच्या त्रासाला सुरुवात झाली.

त्यांची फ्लाईट एकदा नाही, तर तब्बल पाच वेळा रद्द झाली. या संघर्षामुळे मध्य पूर्व परिसरात जवळपास ५२,००० फ्लाईट्स रद्द झाल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे तब्बल ६० लाख प्रवाशांचे हाल झाले. आता दुबई, अबू धाबी आणि रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. पण एकेकाळी मध्य पूर्व हे हवाई वाहतुकीचं मोठं केंद्र होतं. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (IATA) अंदाजानुसार, २०२६ पर्यंत या भागातून प्रवास करणाऱ्यांची संख्या २४ कोटींवर पोहोचण्याची अपेक्षा होती.

फक्त पाच दिवसांसाठी मालदीवला आलेले मुसू आणि शीपर्स आता तीन आठवड्यांपासून इथेच अडकले आहेत. परतीचा मार्ग शोधण्यासाठी ते रोज कित्येक तास इंटरनेटवर आणि एअरलाईनच्या कस्टमर सर्व्हिसला फोन लावण्यात घालवत आहेत. ज्या काही फ्लाईट्स उपलब्ध आहेत, त्यांची तिकीटं प्रचंड महाग आहेत. काही फ्लाईट्स तर वेगवेगळ्या ठिकाणी थांबे घेत तब्बल ५६ तासांपेक्षा जास्त वेळानंतर पोहोचणार आहेत. त्यात व्हिसाच्या समस्यांमुळे प्रवास आणखीच अवघड झाला आहे.

फ्लाईट रद्द झाल्यावर त्यांनी एका रात्रीसाठी त्याच रिसॉर्टमध्ये अर्ध्या दरात मुक्काम केला, पण तेही त्यांना परवडणारं नव्हतं. म्हणून, ते स्वस्त हॉटेलच्या शोधात माफूशी नावाच्या बेटावर गेले. गेल्या दोन आठवड्यांत ते तीन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहिले. यातील एक हॉटेल प्रवाशांनी खचाखच भरलेलं होतं आणि त्यांना तिथे खिडक्या नसलेली एक खोली मिळाली. 'एखाद्या तुरुंगातच राहत असल्यासारखं वाटत होतं,' असं मुसू सांगते.

नंतर त्यांनी बेटावर फिरून स्वतःच एक चांगलं हॉटेल शोधलं. तिथे ते १३ मार्चपर्यंत रात्रीला २०० डॉलर या दराने राहिले. प्रत्येक वेळी फ्लाईट रद्द झाल्यावर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खूप मदत केली. एवढं सगळं होऊनही, हे दोघं सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहेत. किमान आपल्याकडे हॉटेल आणि जेवणासाठी पैसे आहेत, यातच ते समाधानी आहेत. या संकटामुळे आमचं नातं आणखी घट्ट झालं, असं मुसू म्हणते. 'तो माझ्यासोबत नसता, तर मी हे सगळं कसं सहन केलं असतं, मला माहीत नाही. मी पूर्णपणे खचून गेले असते,' असं ती सांगते.