इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा आर्थिक कणा असलेल्या खार्ग आयलंडवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. इराणच्या एकूण तेल निर्यातीपैकी ९०% निर्यात याच बेटावरून होते. जर अमेरिकेने हे बेट ताब्यात घेतले, तर इराणची अर्थव्यवस्था कोसळू शकते आणि जागतिक तेल पुरवठा ठप्प होऊ शकतो.

US Targets Irans Kharg Island Could Petrol Prices in India Cross 200 :Donald Trump Iran Invasion plan: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेलं युद्ध आता अशा वळणावर पोहोचलं आहे, जिथून संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते. मध्य पूर्वेतील तणावाला दोन आठवडे उलटूनही, अमेरिकेचं 'सत्तापालट' (Regime Change) करण्याचं मुख्य उद्दिष्ट अपूर्ण आहे. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अशी खेळी केली आहे, ज्यामुळे संपूर्ण जगात भीतीचं वातावरण पसरलं आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या 'खार्ग आयलंड'वर (Kharg Island) इतिहासातला सगळ्यात मोठा बॉम्बहल्ला केला. या बेटाला इराणची 'तिजोरी' म्हटलं जातं. त्यामुळे आता प्रश्न पडतो की, हे बेट कुठे आहे, ट्रम्प यांची नजर त्यावर का आहे आणि इथल्या एका छोट्या हल्ल्यामुळे भारतात पेट्रोलचे दर २०० रुपयांच्या पुढे का जाऊ शकतात? चला, समजून घेऊया...

खार्ग आयलंडवर ट्रम्प यांची नजर का आहे?

पर्शियन आखातात असलेलं 'खार्ग आयलंड' 'ऑर्फन पर्ल' (Orphan Pearl) किंवा 'फॉरबिडन आयलंड' (Forbidden Island) या नावांनीही ओळखलं जातं. हे बेट आकाराने लक्षद्वीपपेक्षाही लहान आहे, पण त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. इराण आपल्या एकूण तेल निर्यातीपैकी ९०% निर्यात याच छोट्या बेटावरून करतो. २०२४ मध्ये इराणने तेल विकून सुमारे ७.२ लाख कोटी रुपये (७८ अब्ज डॉलर्स) कमावले, ज्याचं मुख्य केंद्र खार्ग आयलंडच होतं. इतकंच नाही, तर इराणच्या मिसाइल आणि ड्रोन कार्यक्रमासाठी लागणारा पैसाही याच बेटावरून मिळणाऱ्या तेलातून येतो. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही देशात फक्त हवाई हल्ले करून आजपर्यंत सरकार पडलेलं नाही. जर ट्रम्प यांना इराणमध्ये सत्ता बदलायची असेल, तर त्यांना जमिनीवर सैन्य उतरवावं लागेल (Boots on ground) आणि त्यासाठी खार्ग आयलंड हे सर्वात योग्य ठिकाण आहे.

इराणवरील हल्ल्याबाबत अमेरिकेचा गुप्त लष्करी प्लॅन

इंडिया टुडेने संरक्षण तज्ज्ञ संदीप उन्नीथन यांच्या हवाल्याने सांगितलं आहे की, अमेरिका खार्ग आयलंडवर कब्जा करण्यासाठी एक मोठी लष्करी कारवाई सुरू करू शकते. या ऑपरेशनचे ४ मुख्य टप्पे असू शकतात. पहिला टप्पा म्हणजे इराणचे रडार आणि एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट करणे, जे शुक्रवारच्या हल्ल्याने सुरू झाले आहे. दुसरा टप्पा म्हणजे अमेरिकेचे स्पेशल फोर्स (Navy SEALs, Delta Force) बेटावरील एकमेव हवाई पट्टी ताब्यात घेतील. तिसऱ्या टप्प्यात C-130 हरक्यूलिस विमानं आणि चिनूक हेलिकॉप्टरमधून हजारो सैनिक उतरवले जातील आणि चौथ्या टप्प्यात तेल टर्मिनल सुरक्षित करून इराणी ड्रोन हल्ले रोखण्यासाठी 'अँटी-ड्रोन सिस्टीम' तैनात केली जाईल.

खार्ग आयलंडवरील हल्ल्याचा भारतावर काय परिणाम होईल?

  • खार्गवरून निर्यात होणारं तेल प्रामुख्याने भारत आणि चीनसारख्या आशियाई देशांमध्ये जातं. जर या बेटावर हल्ला झाला, तर ही सप्लाय चेन पूर्णपणे ठप्प होऊ शकते.
  • इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीला (Strait of Hormuz) आधीच वेठीस धरलं आहे. जर इथे युद्ध भडकलं, तर कच्च्या तेलाचा जागतिक पुरवठाच थांबेल.
  • जेपी मॉर्गन या जागतिक बँकिंग फर्मच्या मते, खार्गवरील हल्ल्यामुळे ऊर्जा बाजारात मोठा विध्वंस होऊ शकतो, ज्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचू शकतात. याच अंदाजानुसार, असं झाल्यास भारतात पेट्रोल-डिझेल प्रचंड महाग होऊ शकतं.