योगेश्वरी बोहारे ही गिर्यारोहक १६,००० फुटांच्या उंचीवर असताना तिला अचानक मासिक पाळी आली. सॅनिटरी पॅड नसताना तिने टिश्यू पेपरपासून जुगाड करत स्वतःचा पॅड बनवला.

योगेश्वरी बोहारे ही गिर्यारोहक १६,००० फुटांच्या उंचीवर ट्रेकिंग करत होती. तिथे तिला अचानक मासिक पाळी आली. आजूबाजूला सॅनिटरी पॅड मिळण्याची कोणतीही सोय नव्हती. मदतीला दुसरी कोणतीही महिला तिथे नव्हती. अशा कठीण वेळी योगेश्वरीने डोकं चालवलं. तिने टिश्यू पेपर आणि मेडिकल टेपचा वापर करून स्वतःसाठी एक जुगाडू सॅनिटरी पॅड तयार केला.

योगेश्वरीने या संपूर्ण अनुभवाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. उंचावर ट्रेकिंग करताना महिलांना कोणत्या अडचणी येतात, हे तिने यातून दाखवून दिलंय. दुर्गम भागात मासिक पाळी आल्यावर काय परिस्थिती ओढवते आणि त्यावर कसा मार्ग काढता येतो, हे तिच्या या व्हिडिओमुळे समोर आलं आहे.

या व्हिडिओमध्ये योगेश्वरी सांगते की, आदल्या रात्रीच तिची पाळी सुरू झाली होती. तिला तिथे अजून चार ते पाच दिवस राहायचं होतं. पण तिच्याकडे सॅनिटरी पॅड नव्हते. त्यामुळे जे काही साहित्य उपलब्ध होतं, त्यातूनच तिने मार्ग काढायचं ठरवलं.

तिने टिश्यू पेपरचे अनेक तुकडे एकावर एक ठेवले. ते दुमडून एक जाड थर तयार केला आणि कडांना मेडिकल टेप लावून ते पॅडसारखं सुरक्षित केलं. हा जुगाडू सॅनिटरी पॅड तयार केल्यानंतर तिने तो कॅमेऱ्यासमोर दाखवला. "हा पॅड खरंच काम करेल की नाही, हे आता पाहावं लागेल," असंही ती या व्हिडिओत म्हणाली.

View post on Instagram
 

व्हिडिओ शेअर करताना योगेश्वरीने सांगितलं की, तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. सॅनिटरी पॅड उपलब्ध नव्हते आणि संपूर्ण ग्रुपमध्ये ती एकटीच महिला होती. त्यामुळे तिला हा जुगाड करावाच लागला.

या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली की, डोंगर आपल्याला फक्त ट्रेकिंग नाही, तर आयुष्याचे अनेक धडे शिकवतात. योगेश्वरीच्या मते, अशा मोहिमांमध्ये परिस्थितीनुसार जुळवून घेणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा परिस्थिती कठीण असते, तेव्हा खंबीर राहून व्यावहारिक मार्ग शोधता आला पाहिजे.