Trump Tariff China : चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवल्याने निर्माण झालेल्या वादानंतर ट्रम्प यांनी हे नवीन पाऊल उचलले आहे. चीनच्या 'आक्रमक' पावलांना प्रत्युत्तर म्हणून १ नोव्हेंबरपासून अतिरिक्त शुल्क लागू होईल.
Trump Tariff China : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. १ नोव्हेंबरपासून चिनी उत्पादनांवर १००% अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. याशिवाय सॉफ्टवेअर निर्यातीवरही निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'च्या माध्यमातून चीनवर अतिरिक्त कर लावल्याची माहिती दिली. निर्यातीचे नियम कठोर करण्याच्या चीनच्या निर्णयाविरोधात अमेरिकेने हे शुल्क लावले आहे. तसेच, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणारी शिखर परिषद रद्द करण्याची धमकीही दिली आहे.
चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवल्याने निर्माण झालेल्या वादानंतर ट्रम्प यांनी हे नवीन पाऊल उचलले आहे. चीनच्या 'आक्रमक' पावलांना प्रत्युत्तर म्हणून १ नोव्हेंबरपासून अतिरिक्त शुल्क लागू होईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. चीनने दुर्मिळ भू-खनिजांच्या निर्यातीवरील निर्बंधांबाबत जगभरातील देशांना पत्र पाठवून स्पष्टीकरण दिल्याचे ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर सांगितले. अमेरिकेतून होणाऱ्या महत्त्वाच्या सॉफ्टवेअर निर्यातीवरही १ नोव्हेंबरपासून निर्बंध लागू होतील, असे ट्रम्प म्हणाले.

शेअर बाजारात घसरण
"चीन असे पाऊल उचलेल यावर विश्वास बसत नाही. पण त्यांनी ते केले. बाकी सर्व इतिहास आहे," असे ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिले. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध पुन्हा भडकल्याने शेअर बाजारात घसरण झाली. नॅस्डॅक ३.६ टक्क्यांनी आणि एस अँड पी ५०० २.७ टक्क्यांनी घसरला. सध्या फेंटॅनिल व्यापारात चीन मदत करत असल्याचा आणि अयोग्य व्यापार पद्धतींचा आरोप करत ट्रम्प यांनी लावलेल्या शुल्कानुसार चिनी उत्पादनांवर ३० टक्के शुल्क आहे. तर चीनने अमेरिकेवर लावलेले प्रतिशुल्क सध्या १० टक्के आहे.
स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वाहने, लष्करी हार्डवेअर आणि अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानासाठी दुर्मिळ भू-खनिजे आवश्यक आहेत. या वस्तूंच्या जागतिक उत्पादन आणि प्रक्रियेत चीनचे वर्चस्व आहे. जगाला 'ओलीस' ठेवण्याची परवानगी चीनला देऊ नये आणि चीन शत्रुत्वाची भूमिका घेत आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला. या महिन्याच्या अखेरीस आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेत अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांची भेट होणार होती. मात्र, आता ती होईल की नाही, हे स्पष्ट नाही. दरम्यान, अमेरिकेच्या या निर्णयावर चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


