Trump Imposes 25 Percent Tariff on Nations Trading with Iran : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५% अतिरिक्त टॅरिफ जाहीर केला आहे. 

Trump Imposes 25 Percent Tariff on Nations Trading with Iran : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५% अतिरिक्त टॅरिफ जाहीर केला आहे. सरकारविरोधी निदर्शने तिसऱ्या आठवड्यात पोहोचली असताना, या निर्णयामुळे इराणवर दबाव वाढू शकतो. हा अतिरिक्त टॅरिफ तात्काळ लागू होईल, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. इराणवर लष्करी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, या प्रतिक्रियेनंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. दुसरीकडे, अमेरिकेशी युद्धासाठी तयार असलो तरी चर्चेसाठीही तयार आहोत, अशी इराणची भूमिका आहे. चर्चा परस्पर आदराने व्हायला हवी, असेही इराणने स्पष्ट केले आहे. लष्करी कारवाईचा विचार करत असल्याच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर इराणने ही प्रतिक्रिया दिली आहे. 

ट्रम्प यांच्या वक्तव्यांमुळे आंदोलकांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, इराणमध्ये आंदोलनात ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. सुरक्षा दलातील शंभरहून अधिक जण मारले गेल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

दरम्यान, देशातील आंदोलनांमुळे निर्माण झालेला दबाव कमी करण्यासाठी इराणमध्ये हालचाली सुरू आहेत. राजधानी तेहरानमध्ये सरकार समर्थक मोठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत १० लाखांहून अधिक लोक सहभागी झाल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. शाह घराण्याचे वारसदार रझा पहलवी यांच्याविरोधातही रॅलीत घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण तेहरानमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. प्रमुख केंद्रे आणि परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. इराणमधील आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी लंडनमधील इराणच्या दूतावासाबाहेर निदर्शने झाली. लंडनमधील इराणी दूतावासाबाहेर सरकारविरोधी घोषणा देत इराणी ध्वजाची चित्रे जाळण्यात आली.