Mexico Violence : मेक्सिकोचा कुख्यात कार्टेल लीडर नेमेसिओ ओसेगुएरा याच्या मृत्यूनंतर देशात हिंसाचार उफाळून आला आहे. ग्वाडलहारा आणि प्यूर्टो वालार्टा शहरांमधील अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहे.
Mexico Violence : मेक्सिकोचा मोस्ट वाँटेड ड्रग माफिया 'एल मेंचो' (El Mencho) एका लष्करी कारवाईत मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण मेक्सिकोमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी केली आहे. 'आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवा आणि सतर्क राहा,' असं आवाहन दूतावासाने केलं आहे. भारताशिवाय अमेरिका आणि कॅनडानेही आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत.
जो जिथे आहे, तिथेच थांबा
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. 'हिंसाचार, रस्त्यांवरील अडथळे आणि विमानसेवा रद्द होत असल्याने, पुढील सूचना मिळेपर्यंत लोकांनी सुरक्षित ठिकाणीच थांबावं,' असं विभागाने म्हटलं आहे. अमेरिकेच्या कॉन्सुलर अफेअर्स विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेक्सिकोच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा अभियान सुरू आहे.
ग्वाडलहारा आणि प्यूर्टो वालार्टामध्ये विमानसेवा रद्द
रस्त्यांवर ठिकठिकाणी नाकाबंदी केल्यामुळे विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. ग्वाडलहारा (Guadalajara) आणि प्यूर्टो वालार्टा (Puerto Vallarta) या शहरांमधील अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. या अशांततेमुळे विमानतळांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
कॅनडाकडूनही ॲडव्हायझरी जारी
कॅनडा सरकारने म्हटलं आहे की ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मेक्सिकोमधील कॅनेडियन नागरिकांना शांतता राखण्याचं आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मिचोआकन (Michoacán), गुएरेरो (Guerrero) आणि जलिस्को (Jalisco) या राज्यांमध्ये गोळीबार आणि स्फोटांच्या घटना घडल्याने नागरिकांना घरातच थांबायला सांगितलं आहे.
अमेरिकन-कॅनेडियन एअरलाइन्सची विमानं रद्द
परिस्थिती बिघडल्याने अनेक अमेरिकन आणि कॅनेडियन एअरलाइन्सनी मेक्सिकोच्या काही शहरांसाठी आपली विमानसेवा रद्द केली आहे. यामध्ये युनायटेड एअरलाइन्स, अमेरिकन एअरलाइन्स, साउथवेस्ट एअरलाइन्स आणि अलास्का एअरलाइन्स यांचा समावेश आहे. तर कॅनडाच्या एअर कॅनडा आणि वेस्टजेट/सनविंगनेही प्यूर्टो वालार्टा, ग्वाडलहारा आणि मंझानिलोसाठीची विमानसेवा रद्द केली आहे.
विमानं अर्ध्या वाटेतूनच परतली
अनेक एअरलाइन्सनी सांगितलं की, काही विमानांना मेक्सिकोला पोहोचण्याआधीच परत बोलवावं लागलं. साउथवेस्ट एअरलाइन्सने प्यूर्टो वालार्टाला जाणारी चार विमानं अर्ध्या वाटेतूनच परत बोलावली. परिस्थिती सामान्य झाल्यावर अडकलेल्या प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष विमानं पाठवली जातील, असं साउथवेस्टने स्पष्ट केलं आहे.


