सार
दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी जेजू एअरचे विमान कोसळले. या दुर्घटनेत १८१ प्रवाशांपैकी १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान बँकॉकहून येत होते आणि लँडिंगदरम्यान हा अपघात झाला. या दुर्दैवी घटनेतील एका प्रवाशाचा शेवटचा संदेश समोर आला आहे. “मी माझे शेवटचे शब्द सांगू का?” हा त्या प्रवाशाचा अंतिम संदेश होता.
न्यूज1 वृत्तसंस्थेनुसार, त्या प्रवाशाने कुटुंबातील एका सदस्याला एक मजकूर संदेश पाठवला, ज्यात असे म्हटले होते की विमानाच्या पंखामध्ये एक पक्षी अडकला आहे. त्या प्रवाशाचे शेवटचे शब्द होते, “मी माझे शेवटचे शब्द सांगू का?”
१८१ प्रवाशांपैकी बहुतेकांचा मृत्यू
ही घटना दक्षिण कोरियाच्या मुआन विमानतळावर रविवारी सकाळी घडली. जेजू एअरच्या प्रवासी विमानाचे पुढील लँडिंग गिअर कार्यरत होण्यात अपयशी ठरल्याने विमान रनवेवरून घसरले आणि काँक्रीटच्या भिंतीवर जाऊन आदळले. ही देशातील सर्वात भीषण विमान दुर्घटनांपैकी एक मानली जात आहे. या दुर्घटनेत विमानातील १८१ प्रवाशांपैकी बहुतेकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या माहिनुसार , मृतांची संख्या १७९ आहे. यापैकी ८३ महिला, ८२ पुरुष आणि ११ जणांचे लिंग ओळखता येत नव्हते. दोन क्रु कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले असून ते शुद्धीवर आहेत. अधिकाऱ्यांनी बचाव मोहिम बंद केली आहे. दुर्घटनेच्या तीव्रतेमुळे विमानातून बाहेर फेकले गेलेले मृतदेह आसपासच्या भागात शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे ली यांनी सांगितले.
दुर्दैवी विमान २००९ साली निर्मित
बँकॉकहून परत येणारे बोईंग ७३७-८०० हे विमान १५ वर्षे जुने होते. वाहतूक मंत्रालयाच्या मते, हे विमान २००९ साली तयार करण्यात आले होते. आपत्कालीन बचावकार्यासाठी ३२ अग्निशमन इंजिन्स, अनेक हेलिकॉप्टर्स, आणि अंदाजे १५६० कर्मचारी सहभागी आहेत ज्यात अग्निशमन दल, पोलिस अधिकारी आणि लष्करी जवानांचा समावेश आहे.
फक्त शेपटीचा भाग शिल्लक राहिला
दक्षिण कोरियाच्या टेलिव्हिजन फुटेजमध्ये दाखवण्यात आले की विमान लँडिंग गिअर उघडले नसल्याने विमान तीव्र वेगाने रनवेवरून घसरत होते आणि नंतर काँक्रीटच्या भिंतीवर आदळले, ज्यामुळे स्फोट झाला. विमान पूर्णपणे नष्ट झाले असून, फक्त शेपटीचा भाग ओळखता येण्यासारखा आहे.
प्राथमिक तपासणीत असे समोर आले की, नियंत्रण टॉवरने पर्यायी लँडिंगसाठी परवानगी देण्यापूर्वी पक्षी अडथळ्याची शक्यता असल्याचा इशारा दिला होता. अपघात होण्याच्या काही क्षण आधी पायलटने आपत्कालीन संदेश पाठवला होता. वाहतूक मंत्रालयाने उड्डाण डेटा आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर हस्तगत केल्याची पुष्टी केली असून तपास सुरू आहे.
जेजू एअरचे अध्यक्ष किम ई-बे यांनी मागितली माफी
या घटनेत प्रवाशांपैकी दोन थाई नागरिकांचा समावेश होता. थायलंडचे पंतप्रधान पैथोंगटर्न शिनवात्रा यांनी शोक व्यक्त केला आणि तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. जेजू एअरचे अध्यक्ष किम ई-बे यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आणि तपासणीचा अहवाल येईपर्यंत जबाबदारी स्वीकारली.बोईंगने शोक व्यक्त केला आणि जेजू एअरला सहाय्याची तयारी दर्शवली. “ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे, त्या कुटुंबियांसाठी आम्ही मनःपूर्वक शोक व्यक्त करतो. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसोबत आमच्या भावना आहेत,” असे बोईंगने सांगितले.
आणखी वाचा-
दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर विमान दुर्घटना; १७९ जणांचा मृत्यू (Video)
HBO आणि केबलव्हिजनचे संस्थापक चार्ल्स डोलन यांचे 98 व्या वर्षी निधन