AI-आधारित Comet ब्राउझर लवकरच Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. Perplexity कंपनीने Google Play Store वर प्री-ऑर्डर सुरू केली असून, लाँचनंतर काही तासांतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
AI वर आधारित Comet ब्राउझर आता मोबाईल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. Perplexity कंपनीने जाहीर केले आहे की हा ब्राउझर लवकरच Android डिव्हाइससाठी येत आहे. Google Play Store वर यासाठी प्री-ऑर्डर सुरू झाली आहे. Perplexity चे CEO अरविंद श्रीनिवास यांनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की Android वापरकर्त्यांना लवकरच Comet वापरता येणार आहे. मात्र iOS वापरकर्त्यांसाठी अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
ग्राहकांचा मोठा प्रतिसाद
घोषणेनंतर काही तासांतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने दावा केला की एका सकाळी एक दशलक्षाहून अधिक लोकांनी Comet वापरण्यासाठी नोंदणी केली. यावरून वापरकर्त्यांमध्ये या ब्राउझरबद्दल मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येते. Comet ब्राउझरमध्ये शोध, चॅट आणि एजंटसारखी कामे एकाच इंटरफेसमध्ये दिली आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना पारंपरिक शोध इंजिनांपेक्षा वेगळा आणि जलद अनुभव मिळतो. हे वैशिष्ट्य Comet ला इतरांपासून वेगळं बनवतं.
भविष्यातील ध्येय काय?
Perplexity कंपनीचा उद्देश पारंपरिक शोध इंजिनांना पर्याय देण्याचा आहे. AI-आधारित साधनांचा वापर करून वापरकर्त्यांना अधिक स्मार्ट आणि सुलभ ब्राउझिंग अनुभव देण्याची त्यांची योजना आहे. त्यामुळे Comet ब्राउझर लाँचनंतर किती लोकप्रिय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
