पाकिस्तानात एका प्रसिद्ध महिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांत अशा प्रकारे हत्या झालेली ही पाचवी महिला इन्फ्लुएन्सर आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

लाहोर: पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या एका महिला इन्फ्लुएन्सरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शमसो बीबी असं या २८ वर्षीय तरुणीचं नाव असून, तिचे तब्बल १३ लाख फॉलोअर्स होते. गेल्या आठ महिन्यांत पाकिस्तानात अशाप्रकारे हत्या झालेली ही पाचवी महिला इन्फ्लुएन्सर आहे.

शमसो बीबी सोशल मीडियावर 'आयशा गिलामना' या नावाने ओळखली जात होती. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी, म्हणजे १४ ऑगस्ट रोजी इस्लामाबादपासून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या टॅक्सिला शहरात ही घटना घडली. शमसो तिच्या भावंडांसोबत कारमधून प्रवास करत होती. त्याचवेळी, बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला.

या हल्ल्यात शमसोच्या मानेला गोळी लागली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दुसऱ्या वाहनाला जाऊन धडकली. या अपघातात शमसोची १५ वर्षांची बहीण असीमा गंभीर जखमी झाली आहे. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी वेगाने गोळीबार केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शमसो बीबीचे वडील फजल साहिबजादा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काशिफ नावाच्या व्यक्तीचा फोन आल्यानंतर शमसो तिची लहान बहीण असीमा आणि भाऊ नईमतुल्लासोबत कारमधून बाहेर गेली होती. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शमसोचे कौसर आणि जावेद उर्फ ​​शाहीन यांच्याशी पैशांचे व्यवहार होते. तिने आपले पैसे परत मागितल्यावर ते दोघे तिला धमक्या देत होते. पैसे हडप करण्यासाठी या दोघांनी काशिफच्या मदतीने हत्येचा कट रचला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी शमसोचे टिकटॉक अकाउंट बंद केले आहे. या प्रकरणात पोलिसांना अद्याप कोणालाही अटक करता आलेली नाही.

पाकिस्तानात महिला इन्फ्लुएन्सर्सवर होणारे हल्ले वाढत असून, ही घटना त्याचंच एक उदाहरण आहे. गेल्या एका वर्षात हत्या झालेली शमसो ही पाचवी महिला टिकटॉक स्टार आहे. याआधी सना जावेद, सना युसूफ, महक शेहजादी आणि सुमीरा राजपूत या सोशल मीडिया स्टार्सचीही अशाच प्रकारे हत्या झाली होती.